खत खरेदीतून अंगठा बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:00 PM2018-09-15T23:00:58+5:302018-09-15T23:01:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील खत विक्रेत्यांसाठी शासनाने ई-पास मशिन दिले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे हे मशिन बिनकामी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर पर्याय म्हणून ई-आधार नंबरद्वारे खत सुरू करण्यात आली. यापुढे शेतकऱ्यांकडून अंगठा घेण्याची सक्ती राहिली नाही. ग्रामीण भागातील कृषी विक्रेत्यांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खत उपलब्ध करून दिले नाही तर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकरी खताची खरेदी करीत आहेत. रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळावे, याकरिता शासनाने ५० ऐवजी ४५ किलोची गोणी तयार केली. याबाबत शेतकरी समाधानी आहेत. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होऊ नये, याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागृती घडविली होती. त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. परंतु, ुसोयाबीन, कापूस, धान व अन्य कडधान्य पिकांसाठी कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कमी मात्रेमध्ये रासायनिक तसेच मिश्र खतांचा वापर करणे गरजेचे आहे. पण अनुदानाच्या आमिषामुळे गैरव्यवहाराचे प्रकार घडत होते. शेतकऱ्यांना ही खते अनुदानावर दिली जातात. मात्र यापुर्वीच्या चुकीच्या पद्धतीमुळे कृषी व्यापाऱ्यांनाच मोठ्या प्रमाणात फायदा व्हायचा. हा गैरव्यवहार टाळण्यासाठी शासनाने परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांना ई-पास (पॉइंट आॅफ सेल) मशीन देण्याचा निर्णय घेतला होता. या मशिनद्वारेच शेतकऱ्यांना खत खरेदी करावी लागत होती. त्यावर अंगठा लावल्याशिवाय विके्रते शेतकऱ्यांना खत देत नव्हते. जिल्ह्यातील दुर्गम भागातील कृषी केंद्रांमध्ये ई-पास मशिन वारंवार बंद पडण्याच्या घडत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. पास मशिनच्या नियमामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढला. तर दुसरीकडे काही दुकानांमध्ये हीच मशिन नसल्याने खत खरेदी करण्याचे अधिकृत मार्ग बंद झाले होते. शेतकऱ्यांनी याविरूद्ध तक्रारी केल्याने आधार क्रमांकावर रासायनिक व मिश्र खते देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खत खरेदीसाठी विक्रेत्यांनी मशिनवर अंगठा ठेवणे सक्तीचे केले. यातून समस्यांमध्ये वाढच झाली. दुकानदारांनी पास मशिन बंद असल्याचा कारणावरून शेतकऱ्यांना परत पाठवू लागला. ही अडचण आता दूर झाली आहे.
नादुरुस्त मशिनमुळे विक्रेते त्रस्त
कृषी निविष्ठा विक्रीकरिता शासनाने ई-पास मशिन पुरविले होते. पण, जिल्ह्यातील बहुतांश विक्रेत्यांकडील मशिन बंद असल्याचा आरोप कृषी विक्रेत्यांनी केला. खत खरेदीकरिता आधार कार्डचा पर्याय स्वीकारण्यात आला. परंतु, यासंदर्भात पत्र न मिळाल्याने विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. शासकीय यंत्रणेकडून मशिन दुरुस्त करण्याची मागणी कृषी विके्रत्यांनी केली आहे.