तिघांचा बळी घेणाऱ्या वाघिणीपाठोपाठ वाघही जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 10:53 AM2023-11-07T10:53:46+5:302023-11-07T10:55:45+5:30

ब्रह्मपुरी वनविभागातील घटना

After tigress that kills three, tiger also tranquilized and caged; Citizens breathed a sigh of relief | तिघांचा बळी घेणाऱ्या वाघिणीपाठोपाठ वाघही जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

तिघांचा बळी घेणाऱ्या वाघिणीपाठोपाठ वाघही जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागात तीन जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीपाठोपाठ तिच्या साथीदार नर वाघालाही सोमवारी (दि. ६) सकाळी ८ वाजेच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले. गेल्या आठवड्यात तीन घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला. यामुळे नागरिकांत तीव्र संताप होता.

ब्रह्मपुरी वनविभागामध्ये २९ ऑक्टोबर रोजी वाघाने पळसगाव वन परिक्षेत्रातील बेलारा येथे एका मेंढपाळाचा बळी घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा खडसंगी वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. १ नोव्हेंबर रोजी हळदा गावातील सैत्राबाई नामदेव कामडी (७०) या महिलेला ब्रह्मपुरी वनविभागाच्या आवळगाव उपक्षेत्रातील हळदा बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक ११६८ मध्ये शेतात भात कापणी करत असताना वाघाने ठार केले.

वनविभागाने कॅमेरा ट्रॅप बसवल्यानंतर हळदा घटनेत वाघाचे दोन मोठे बछडे सामील असल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून ब्रह्मपुरी वनविभागाचे वनकर्मचारी कुटुंबापासून दूर गेलेल्या या दोन मोठ्या बछड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे दोन ते अडीच वर्षे वयाच्या वाघिणीच्या स्थळाची माहिती मिळताच तिला सायंकाळी ४ वाजता जेरबंद करण्यात आले. सोमवारी सकाळी ८:३० वाजता पुन्हा त्याच परिसरात तिच्या दोन ते अडीच वर्षे वयाच्या साथीदार नर वाघाला पकडण्यातही यश आले. दोन वाघांना जेरबंद केल्याने वनविभाग आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा.) शेंडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. खोब्रागडे, पोलिस नाईक (शूटर), जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा, आरआरटी सदस्य दिपेश डी. टेंभुर्णे, योगेश डी. लाकडे, गुरु नानक व्ही. ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल्ल वाटगुरे, ए. डी. कोरपे, ए. एम. दांडेकर, नूर अली सय्यद, जय सहारे आदींच्या पथकाने केले.

Web Title: After tigress that kills three, tiger also tranquilized and caged; Citizens breathed a sigh of relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.