चंद्रपूर जिल्ह्यात शौचालयापाठोपाठ आता घरकुलही झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:56 AM2018-01-24T10:56:54+5:302018-01-24T10:57:23+5:30
शौचालयापाठोपाठ लाभार्थ्यांचे घरकूलही गायब झाले असून बांधकाम न करताच घरकूल बांधल्याची शासन दरबारी नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर येथे उघडकीस आला आहे.
फारुख शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुक्यात काही महिन्यांपुर्वी शौचालय घोटाळा चांगलाच गाजला होता. आता शौचालयापाठोपाठ लाभार्थ्यांचे घरकूलही गायब झाले असून बांधकाम न करताच घरकूल बांधल्याची शासन दरबारी नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर येथे उघडकीस आला आहे.
जनकापूर येथील गुंडेराव भीमू आत्राम, विठ्ठल लटारी नैताम यांना सन २०१३-१४ मध्ये इंदिरा आवास योजनेंतर्गत एक लाख रुपये अनुदानाचे घरकुल मंजूर झाले. तत्कालीन ग्रामसेवकाने सदर लाभार्थ्यांना घरकूलाचे बांधकाम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार लाभार्थ्यांनी आपले कच्चे घर पाडून घरकूल बांधकामाला सुरुवात केली. अनुदानासाठी बँकेचे खाते उघडले.
मात्र एक महिन्यानंतर पहिल्या बिलासाठी लाभार्थी जिवती पंचायत समितीमध्ये गेले असता त्यांना धक्काच बसला. येथे त्यांना आपले घरकूल बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद आढळून आली. त्यामुळे लाभार्थी माघारी परतले.
घरकूल बांधून द्यावे
अनेकांनी घरकूल मिळणार म्हणून आपले राहते कच्चे घर पाडून टाकले. मात्र बांधकामाआधीच बांधकाम पूर्ण झाल्याची शासन दरबारी नोंद आहे. परिणामी लाभार्थ्यांना अनुदानासाठी चकरा माराव्या लागत असून कुटुंब उघड्यावर आले आहे. काही दिवसांपुर्वी जिवती तालुक्यातील पाटण व धनकादेवी ग्रामपंचायत अंतर्गत लाभार्थ्यांचे शौचालय चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचावर गुन्हे दाखल करण्यात आले व लाभार्थ्यांना नव्याने शौचालय बांधून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. आता घरकूल घोटाळा उघडकीस आल्याने प्रशासन संबधितांवर काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
जिवती तालुक्यात घरकुलांची अशी ५६ प्रकरणे असून कार्यालयीन तत्कालीन लिपीकाच्या चुकीमुळे लाभार्थ्यांनी घरकूल न बांधताच बांधल्याचे दर्शवले आहे. या ५६ लाभार्थ्यांची नावे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविली आहेत.
- सुरेश बागडे, संवर्ग विकास अधिकारी, जिवती.
शासकीय कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे आमचे कुटुंब उघड्यावर आले आहेत. घरकुल मिळणार म्हणून कच्चे घर पाडून टाकले. पाळीव बकऱ्या विकून घरकुलासाठी जोत्याचे बांधकाम केले. मात्र आवास योजनेचे अनुदान मिळालेले नाही. अनुदानासाठी पंचायत समितीत वारंवार चकरा मारत आहोत.
- विठ्ठल लटारी नैताम, लाभार्थी, जनकापूर.