अनलाॅकनंतर भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:18+5:302021-06-23T04:19:18+5:30

चंद्रपूर : मान्सून दाखल झाल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी ...

After unlock, vegetables became 25 per cent more expensive | अनलाॅकनंतर भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला

अनलाॅकनंतर भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला

Next

चंद्रपूर : मान्सून दाखल झाल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. या परिसरातील शेतकरी भात, सोयाबीन, कापूस पिकांचे उत्पादन घेत असतात. पीक निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी भाजीपाल्याची लागवड करीत असतात. त्यामुळे उन्हाळभर शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची आवक माेठ्या प्रमाणावर असते. यासोबतच बाहेरील बाजारपेठेतून भाजीपाल्याची आवक होत असते. याचा परिणाम म्हणून उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दरही कमी व स्थिर असतात, परंतु यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात मान्सून बरसला. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागले. परिणामी भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पूर्वी २० रुपये किलो असलेले कांदे ३० रुपये तर टोमॅटोसुद्धा २० रुपये किलोवरुन ३० रुपयांवर पोहोचले आहे. लसून ३० ते ४० रुपये पाव दराने विकला जात आहे. यासोबतच बटाटे, भेंडी, मिरची, फुलकाेबी, पत्ताकाेबी, कारले, वांगी, पालक आदी भाजीपाल्यांचे दर पंधरवड्यापूर्वी कमी हाेते. त्यानंतर आता या सर्वच भाजीपाल्याच्या किमतीत जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासोबतच मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. काही दिवसांपूर्वी तेलाचे दर कमी झाले होते. मात्र आता भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

कोट

जेवणात हिरव्या भाजीपाल्याचा समावेश असावा, असे डॅाक्टर सांगतात,परंतु कोणतीही भाजी खरेदी करण्यास गेला तर १५ रुपये पाव आहे. त्यामुळे काय खरेदी करावे हे कळेनासे झाले आहे. कोरोना लॉकडाऊनने सर्वच आर्थिक गणितच कोलमडले आहे. कडधान्य खाण्यावर भर आहे.

- संजना बन्सोड, गृहिणी

काही दिवसांपूर्वी तेलाचे दर कमी झाले; मात्र आता भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. पूर्वीच कोरोनाने आर्थिक घडी बसवताना अडचण जात आहे. त्यातच दररोजच्या होणाऱ्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. साध वरणभात खाणेसुद्धा अवघड झाले आहे.

- प्रिया गेडाम, गृहिणी

मान्सून दाखल झाल्याने शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत. तसेच पावसाळ्यामुळे शेतातील भाजीपाला निघणे बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला बंद झाला आहे. केवळ बाजारपेठेतून भाजीपाल्याची आवक होत आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याचे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. साधारणत: जून महिन्यात दर वाढतच असतात.

- राकेश रघाताटे, व्यापारी

जून महिन्यात भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याने दरवर्षीच भाजीपाल्याचे दर वाढत असतात. उन्हाळ्यात कांद्यांचे दर कमी होत असतात. परंतु, पावसाळ्यात दर वाढत असतात. सध्या २० ते २५ टक्क्याने भाजीपाला महागला आहे.

- रुपम खैरे, विक्रेता

जेव्हा आमचा भाजीपाला बाजारपेठेत येतो. तेव्हा दर घसरले असतात. परंतु, ज्यावेळेस शेतातील भाजीपाला संपतो. त्यावेळी भाजीपाल्याच्या किमती वाढत असल्याचे नेहमीच बघायला मिळते

- रुपेश राऊत, शेतकरी

भाजीपाला पिकातून उत्पन्न मिळेल या आशेने आम्ही दरवर्षी भात पीक निघाल्यानंतर भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतो, परंतु दरवर्षीच पदरी निराशा पडत असते.

- रघूजी लाड, शेतकरी

Web Title: After unlock, vegetables became 25 per cent more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.