लेखी आश्वासनानंतर वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे
By admin | Published: June 18, 2016 12:35 AM2016-06-18T00:35:53+5:302016-06-18T00:35:53+5:30
वेकोलिने नोकरीवर सामावून घ्यावे, या मागणीकरिता मागील काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू होते.
वरोरा : वेकोलिने नोकरीवर सामावून घ्यावे, या मागणीकरिता मागील काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू होते. त्यानंतर गुरूवारी कोळसा खाणीचे काम बंद पाडण्यात आले. अखेरीस वेकोलिने नोकरी देण्याची लेखी हमी दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी आंदोलन मागे घेतले.
न्यु माजरी टू ओपन कास्ट या खुल्या कोळसा खाणीकरिता जून २०१५ मध्ये पाटाळा, शिवाजी नगर, नागलोन, पळसगाव गावातील जमीन संपादित करुन मोबदला देण्यात आला. त्यानंतर वेकोलिने कोळसा उत्पादन सुरू केले. प्रकल्पग्रस्तांना वेकोलिच्या वतीने ४८ दिवसाचे प्रशिक्षण देऊनही नोकरी देण्यास टाळाटाळ झाली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी ९ जूनपासून साखळी व आमरण उपोषण सुरू केले.
याबाबत सीएमडी सोबत चर्चा करण्यात आली. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्याने आमरण उपोषण सुरू ठेवले. त्यातच अचानक न्यु माजरी टू ओपन कास्टचे काम गुरूवारी बंद पाडण्यात आले. कोळसा खाणीचे काम बंद पडताच वेकोलि प्रशासन खळबळून जागे झाले. घटनास्थळावर वेकोलिचे अधिकारी पोहचले. त्यात झालेल्या वाटाघाटीत प्रकल्पग्रस्तांना रोजगारासंबंधी ३० जुलै पर्यंत कार्यवाही पूर्ण केली जाईल, वेकोलि व प्रकल्पग्रस्त एकमेकांना सहकार्य करतील. ज्या प्रकरणात कागदपत्र लागतील ते कागदपत्र प्रकल्पग्रस्त वेकोलिला देतील, वेकोलि बोर्डाच्या अनुमती नंतर दहा दिवसात कार्यवाही करुन १५ आॅगस्टपर्यंत मोबदला, नोकरी देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)