वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:13+5:302021-06-18T04:20:13+5:30
चंद्रपूर : मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलबरोबरच खाद्यतेलांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे सामान्यांच्या तेलाची फोडणी महागली ...
चंद्रपूर : मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलबरोबरच खाद्यतेलांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे सामान्यांच्या तेलाची फोडणी महागली असून, चव बदलली होती. खाद्यतेलाच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या. यामध्ये सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल तेलाचे भाव गगनाला भिडले होते. दरम्यान, सध्या या तेलाचे भाव काही प्रमाणात कमी झाल्यामुळे सामान्यांसह सर्वांनाच थोडाफार दिलासा मिळाला आहे.
सणांचे दिवस तसेच लग्न हंगामाच्या दिवसामध्ये तेलाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. यामुळे किमती वाढतात. मात्र यावर्षी लाॅकडाऊनमुळे सण साजरे करता आले नाही. तसेच लग्नसमारंभावरही निर्बंध आले. असे असतानाही बाजारपेठेमध्ये तेल मोठ्या प्रमाणात महागले. कोरोनाच्या संकटातच भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले. दरम्यान, सद्य:स्थितीत तेलाचे भाव काहीअंशी कमी झाल्यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र आता पुढे आणखी सणांचे दिवस सुरू होणार आहे. त्यामुळे या दिवसात तेलाचे भाव वाढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो)
तेल आधीचे आत्ताचे
सूर्यफूल १९० १८०
सोयाबीन १६५ १५०
शेंगदाणा २०० १८०
पामतेल १४० १३०
बाॅक्स
शेतकऱ्यांच्याही घरात विकतचे तेल
काळ बदलला आहे. आता शेतकरी नगदी पिकाकडे वळले आहेत. यामध्ये कापूस, सोयाबीनकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पूर्वी बाजारात नवनवीन तेलाचे पर्याय नव्हते. त्यामुळे शेतकरी शेतात तेलपीक घ्यायचे तसेच घाण्याचे तेल घरात वापरायचे. आता मात्र ते परवडण्यासारखे नसल्यामुळे हा पर्याय बंद केला असून, थेट बाजारात जाऊन तेल विकत घेतले जाते.
-विनायक जुनगरी
चंद्रपूर
कोट
पूर्वी तीळ, जवस यातून तेल काढून तेच तेल घरात वापरले जात होते. आता मात्र फिल्टरचा जमाना आहे. त्यातच घाण्यातून तेल काढण्याची प्रक्रिया मोठी आहे. त्यामुळे शेतकरी पिकविलेला माल बाजारात विकतात आणि बाजारातील तयार आणि फिल्टर असलेले तेल विकत घेतात. त्यामुळे कुणीच आता घाणीवर जाऊन तेल काढण्याच्या भानगडीत पडत नाही.
तुकाराम काकडे
गडचांदूर