वर्षभरानंतर ‘ती’ गवसली, परंतु त्याला स्वीकारण्यास नकार
By admin | Published: July 8, 2015 01:19 AM2015-07-08T01:19:51+5:302015-07-08T01:19:51+5:30
१० वर्षभरापासून एकत्रित राहताना ‘ती’ अचानक बेपत्ता झाली. याबाबत प्रियकराने पोलिसात तक्रार दिली. पोलीस ठाण्यात चकरा मारून प्रेयसीचा शोध लागला काय,
वरोरा : १० वर्षभरापासून एकत्रित राहताना ‘ती’ अचानक बेपत्ता झाली. याबाबत प्रियकराने पोलिसात तक्रार दिली. पोलीस ठाण्यात चकरा मारून प्रेयसीचा शोध लागला काय, म्हणून तो सतत विचारणा करीत होता. अखेर वर्षभरानंतर पोलिसांना बेपत्ता प्रेयसीचा शोध लागला. ही बातमी प्रियकराला कळताच त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. प्रेयसीला घेण्यासाठी प्रियकर पोहोचला. परंतु, तिने सोबत राहण्यास नकार दिल्याने क्षणार्धात प्रियकराला हिरमुसला होऊन परतावे लागले.
वरोरा तालुक्यातील एका गावातील एक अविवाहित वयस्क बल्लारपूर येथे काही कामानिमित्त गेला असता, तेथे त्याची वयस्क महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि मागील दहा वर्षांपासून दोघेही एकत्र राहू लागले. यामध्ये दोघांनीही कुठल्याही पद्धतीने विवाह केला नाही, हे विशेष!
दहा वर्षांपासून दोघेही एकत्र राहत असताना त्याने परत एका विवाहित महिलेला लग्न न करताच आपल्या सोबत ठेवले. मात्र ती महिला काही दिवसांनी निघून गेली. त्यानंतर काही दिवसांनी बल्लारपूर येथील महिलाही त्याला सोडून निघून गेली. याबाबत सदर इसमाने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली. पत्नीचा फोटोही दिला व तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांसोबतही फिरला. तिचा शोध लागावा व तिला आपल्यासोबत ठेवावे याकरीता ‘तो’ सातत्याने पोलिसांकडे येत होता.
पोलिसांनी बेपत्ता झालेल्यांची शोध मोहीम सुरू केली. यात बेपत्ता ‘त्या’ महिलेचा शोध घेताना ती महिला जेथे वास्तव्यास आहे, त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. पोलिसांना तेथे बघून ती महिला अवाक झाली.
मात्र ‘त्या’ महिलेने सोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. ‘माझी तक्रार देणारा तो कोण, कारण मी त्याच्या सोबत विवाह केलेला नाही. मला तुम्ही शोधले, परंतु मी त्याच्याकडे राहायला जाणार नाही’ असे ती म्हणाली. अखेर बेपत्ता झालेल्या पत्नीच्या प्रकरणावर त्या महिलेने तत्काळ पडदा टाकत बेपत्ता प्रकरणाचा निपटारा केला आणि विवाहाविना असलेला पती पत्नीविना परत आला. (तालुका प्रतिनिधी)