पाणी पुरवठ्याबाबत पुन्हा मनपाची चालढकल
By admin | Published: September 20, 2016 12:39 AM2016-09-20T00:39:28+5:302016-09-20T00:39:28+5:30
चंद्रपूरकर सध्या अनियिमित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराची मनमानी कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
ठोस निर्णय नाही : ‘उज्ज्वल’ ला मनपाकडून अभयच
चंद्रपूर : चंद्रपूरकर सध्या अनियिमित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराची मनमानी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मनपाच्या प्रत्येक आमसभेत याविषयी जाब विचारला जातो. मात्र उपाययोजना होत नाही. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी महानगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र यावेळीदेखील मनपा प्रशासनाकडून ठोस निर्णय होऊ शकला नाही.
विशेष म्हणजे, कंत्राट रद्द करण्याची अनेक नगरसेवकांची मागणी असतानाही मनपाने उलट वीज दर वाढल्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्णपणे भरल्या जात नाही, त्यामुळे वाढलेल्या वीज दराची रक्कम सबंधित कंत्राटदाराला देण्याचा निर्णय या सभेत घेतला.नवीन योजना सुरू होईपर्यंत पुन्हा एकही नळ कनेक्शन देऊ नये, असेही यावेळी ठरविण्यात आले.
शहराला पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. मात्र ही कंपनी मागील दोन वर्षांपासून शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा करीत नाही. पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेज आहे. मात्र त्याची दुरुस्ती केली जात नाही. मनपाची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यामुळे नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाणी द्या, अशी त्यांची मागणी आहे. आजच्या सभेतही नगरसेवक पाणी पुरवठ्याबाबत विविध सूचना देत राहिले. माजी उपमहापौर संदीप आवारी यांनी संबंधित कंत्राटदाने किती सूचनांचे पालन केले, याविषयी जाब विचारला. त्यावर अभियंता गादेवार म्हणाले, कंत्राटदाराला २७ मुद्यांवर सुधारणा करण्याचे सूचविले होते. मात्र बहुतांश बाबीत ठेकेदाराने सुधारणा केली नाही, असे सांगितले. नळ कनेक्शनसाठी ठेकेदार अधिकचा पैसा वसूल करीत असल्याची माहिती सभागृहात दिल्यानंतर नगरसेवक रामू तिवारी यांनी, पुरावा असतानाही मनपा याबाबत गुन्हा दाखल का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. यावर करारात तसे नमूद नाही, असे उत्तर आयुक्तांनी दिले. नगरसेविका सुनिता लोढिया यांनी नवीन पंप घेण्याची सूचना केली, बलराम डोडानी यांनी यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करण्याची सूचना केली. नगरसेवक संदीप आवारी पाणी पुरवठ्याबाबत अतिशय आक्रमक दिसत होते. पाणी पुरवठा योजना मनपाने आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. यावर माहिती देताना आयुक्त संजय काकडे म्हणाले, ही योजना चालवायला २४५ कर्मचाऱ्यांची गरज पडेल, जी मनपा आज पूर्ण करू शकत नाही. याशिवाय सध्या नागरिकांकडून १०५० रुपये जलकर वसूल केला जात आहे. योजना चालविली तर अडीच हजार रुपये जलकर घ्यावा लागेल, अशी माहितीही त्यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)
आवारी व वैद्य यांच्यामध्ये बाचाबाची
सभेमध्ये अमृत योजनेवर चर्चा सुरू होताच नगरसेवक संजय वैद्य यांनी जुन्या योजना कशा अयशस्वी झाल्या, हे सांगणे सुरू केले. यावर उपमहापौर संदीप आवारी यांनी यासाठी राष्ट्रवादीचे नेतेच जबाबदार असल्याचे सांगितले. त्यामुळे संजय वैद्यदेखील भडकले. दोघांमध्ये यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वैद्य यांनी आपला अमृत योजनेला विरोध नसून धानोरा येथून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगितले. यात मनपाला ३० कोटींचा फटका बसेल. इरई धरणातून सीटीपीएस दरवर्षी १०० दलघमी पाण्याची उचल करते. ८० ते १०० दलघमी पाणी धरणात शिल्लक राहते. शहराला २५ ते ३० दलघमी पाणी पुरसे आहे. या धरणातूनच मनपाने पाणी घ्यावे. कुणी अडथळा आणल्यास मनपा याचिकादेखील दाखल करू शकते. वाटल्यास जलसंपदा मंत्रालयाशी मनपा प्रशासनाने चर्चा करावी, असेही संजय वैद्य यांनी सांगितले.
महानगरपालिकेवर मोर्चा
पाणी पुरवठ्याबाबत आयोजित विशेष सभा सुरू असतानाच पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या श्यामनगर, इंदिरानगर येथील नागरिकांनी मनपा कार्यालयावर मोर्चा आणला. दुपारी १२ वाजता श्यामनगर येथील आंबेडकर चौकातून हा मोर्चा निघाला होता. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चेकरी मनपा कार्यालयावर धडकले. तिथे जोरदार घोषणा दिल्या.