कोरोना पार्श्वभूमीवर आता राज्यातील रुग्णांची ‘सारी टेस्ट’ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 07:20 PM2020-04-04T19:20:20+5:302020-04-04T19:20:53+5:30
यापुढे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांनी बाह्य व आंतर रुग्णांची सेवीअर अॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस (सारी) तपासणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजेश भोजेकर
चंद्रपूर : राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या कोवीड-१९ रुग्णांच्या संख्येमध्ये सतत वाढ होते आहे. गेल्या आठवड्यात ३ रुग्णांचा खूप कमी कालावधीचा आजार असतानाही दुदैवी मृत्यू झाला. तसेच काही कोवीड-१९ संशयित रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे (थ्रोट स्वॅब) नमुने प्रयोगशाळेच्या अहवालानुसार एच १ एन १ साठी पॉझिटीव्ह आले. ही बाब राज्य शासनाच्या आरोग्य संचालनालयाच्या लक्षात आली आहे. या आधारे रुग्णांना लवकर उपचार मिळावेत आणि मृत्यू टाळता यावा, यासाठी यापुढे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांनी बाह्य व आंतर रुग्णांची सेवीअर अॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस (सारी) तपासणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्या आहेत.
‘सारी’ अंतर्गत ५ वर्षांवरील व्यक्तींना अचानक सुरू झालेला ३८ अंश सेल्सिअस ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे वा श्वास घेण्यास त्रास होणे. तसेच रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासणे अशा रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. शिवाय ५ वर्षांखालील मुले ज्यांना निमोनिया झाला आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे. अशा मुलांचीही सारी अंतर्गत तपासणी करण्याच्या मार्गदर्शक सूचना पुणे येथील राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेल्या आहेत.
‘सारी’ रुग्ण आढळल्यास त्यांना त्वरीत १०८ अॅम्बुलन्सद्वारे जवळच्या कोवीड-१९ साठी निश्चित केलेल्या १०० व त्यापेक्षा जास्त खाटा असणाºया रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. या रुग्णास कोवीड सस्पेक्ट कक्षात भरती करून लक्षणानुसार उपचार सुरू करावयाचा आहे. तसेच घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो कोवीड-१९ तपासणीसाठी त्या रुग्णालयासाठी निश्चित केलेल्या प्रयोगशाळेत पाठवायचा आहे. प्रयोग शाळेचा अहवाल प्राप्त होईपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे क्लिनिकल डायग्नोसिस कोवीड -१९ असल्यास रुग्णास उपचारही सूचविला आहे.
अहवालानंतर घ्यावयाची काळजी
रुग्णाचा घशातील स्त्रावाच्या तपासणीचा अहवाल कोवीड-१९ व एच १ एन १ दोन्हीसाठी निगेटीव्ह आल्यास जनरल वॉर्डमध्ये हलवून लक्षणानुसार उपचार करावयाचा आहे. अहवाल एच १ एन १ व कोवीड-१९ निगेटीव्ह आल्यास रुग्णास एच १ एन १ आयसोलेशन फॅसिलिटीला हलवून एच १ एन १ उपचार करावयाचा आहे. आणि अहवाल कोवीड- १९ पॉझिटीव्ह आल्यास रुग्णास कोवीड -१९ आयसोलेशन वॉर्डात हलवून लक्षणानुसार उपचार करावयाचा आहे. प्रकृती अत्यवस्थ असल्यास त्वरीत कोवीड -१९ आयसीयुमध्ये दाखल करावयाच्या सूचनाही राज्यातील आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत.