कामात रमले की वयाचा विसर पडतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:26 AM2019-08-11T00:26:40+5:302019-08-11T00:27:03+5:30
मनात उत्साहा असला की वयाला मागे टाकून उर्मीने कामात झोकून देता येते. त्यातून वेळ चांगला जातो आणि आपले हातून काहीतरी चांगले भरीव घडत असल्याचा मनस्वी आनंदही मिळतो.
वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : मनात उत्साहा असला की वयाला मागे टाकून उर्मीने कामात झोकून देता येते. त्यातून वेळ चांगला जातो आणि आपले हातून काहीतरी चांगले भरीव घडत असल्याचा मनस्वी आनंदही मिळतो. बल्लारपूर - चंद्रपूर आपल्या हातांनी तयार केलेले आंब्याचे चवदार लोणचे, मसाले नक्षीदारपणे सजविलेले मातीचे दिवे, महिलांच्या आवडत्या श्रृंगाराच्या वस्तू, कागदांची पाकीट हे सारे बघितल्यानंतर वरील विधानाची साक्ष पटते. या साऱ्या वस्तू वृद्ध आनंदाने, उत्साहात एकत्रित बसून बनवितात. वृद्धाश्रमाला भेट देणारे त्या वस्तू विकत घेतातच, बाहेरही या वस्तूंना मागणी आहे.
दिवाळीत येथील कलात्मक दिव्यांना मुंबई - पुणे भागातून पसंती मिळाली असून दरवर्षी तेथून त्याकरिता आॅर्डर मिळतात. दरवर्षी सुमारे सव्वा लाख दिवे सजवून विकले जातात. इतर अन्य वस्तूबाबतही जवळपास तेच. या वस्तूंच्या विक्रीतून वृद्धाश्रमाला आर्थिक सहाय्य मिळते. आणि आपण, आपल्या या वृद्धाश्रमाकरिता काही तरी करीत आहोत, याचे समाधान तेथील वृद्धांना मिळते. या उपक्रमाच्या घरगुती उद्योगाच्या प्रेरक या वृद्धाश्रम समितीच्या अध्यक्ष माजी मंत्री शोभाताई फडणवीस या आहेत. ट्रस्टी डॉ. रजनीताई हजारे, व्यवस्थापिका अर्चना लाडसावंगीकर या वृद्धांना प्रेरित करून त्यांना या कामी मदत करीत असतात. या सोबतच तेथील १७ वृद्धांनी देहदानाचा संकल्प केला आहे. त्यातील चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे देहदान चंद्रपूर मेडिकल कॉलेजला करण्यात आले. आत्मबल आणि सामाजिक बांधिलकी जपणाºया या वृद्धाश्रमात सध्या ३२ वृद्ध आहेत. हे वृद्धाश्रम २६ फेब्रुवारी १९९५ ला उघडले. प्रारंभी शासनाकडून अनुदान मिळत असे. काही वर्षांनी अनुदान मिळणे बंद झाले. त्यामुळै आश्रम कसा चालावयाचा, असा प्रश्न उभा झाला. काही दानशूर मदतीला धावून आले. सेवाभावी व सामाजिक संस्थांकडूनही मदत मिळू लागली आणि हे वृद्धाश्रम गेले सुमारे २४ वर्षांपासून वृद्धांंना सर्व सोयी देत, त्यांची देखभाल करीत सुरू आहे. वृद्धांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतूनही काही हातभर मिळतो आहे. एक एकराची शेती आहे. वृद्ध आवडीने तेथेही रमतात. कामात मदत करतात. आत्मबल असले की सारे साध्य होते. हेच या साºयातून दिसून येते.