पैशाच्या पावसासाठी निर्वस्त्र कुमारिकेसोबत अघोरीपूजा
By Admin | Published: September 24, 2016 07:27 PM2016-09-24T19:27:25+5:302016-09-24T19:27:25+5:30
कुमारी मुलीला निर्वस्त्र करून पूजा केल्यास पैशाचा पाऊस पडेल, असे सांगून अघोरी पूजा करताना तांत्रिकासह चार महिलांना भद्रावती पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले आहे
>भद्रावतीतील घटना : तांत्रिकासह चार महिला ताब्यात
भद्रावती, दि. 24 - कुमारी मुलीला निर्वस्त्र करून पूजा केल्यास पैशाचा पाऊस पडेल, असे सांगून अघोरी पूजा करताना तांत्रिकासह चार महिलांना भद्रावती पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील कुमारिका व घरमालक उच्च शिक्षित आहेत, हे विशेष.
नागपूर येथील इंदोरा भागात राहणारा दर्शन भीमराव पाटील (२५) या तांत्रिक बाबाने बल्लारपूर येथील शशिकला गजानन पंदिलवार या महिलेच्या सहकार्याने बल्लारपूर येथे एक २५ वर्षीय आणि दुसरी २३ वर्षीय कुमारिकांना पूजेसाठी तयार केले. ही पूजा भद्रावती येथील पांडववार्ड (विंजासन) येथील सुनिता माथनकर यांच्या घरी २३ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजतापासून सुरू केली होती. अघोरी पूजेत दिवे, गडवा, पैसा, नारळ, अगरबत्ती, फुले, कापूर या साहित्याचा वापर करण्यात आला.
पूजा सुरू करताना दोन्ही कुमारिकांना निर्वस्त्र करून बसविण्यात आले. यावेळी मोठ-मोठ्या आवाजात सुरू असलेल्या मंत्रांमुळे शेजाºयांना शंका आली. त्यांनी या पूजेची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी पूजास्थळी धाड टाकली. तेथे पूजा साहित्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या सर्व आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आले. पूजेसाठी आरोपींसह बल्लारपूर येथील शशिकला पंडित आणि चंद्रपूर येथील कल्पना उमाजी भडके, तिचा पती उमाजी श्रावण भडके, रंजिता सुधीर कोबे, सुरेखा वानखेडे आदी उपस्थित होते. ही कारवाई ठाणेदार विलास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मेघाली गावंडे, पोलीस उपनिरीक्षक सुशील धोकटे, पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांनी केली. अशी पूजा तांत्रिकाने आणखी कुठे आणि कुणाच्या सहकार्याने केली, याचा पोलीस शोध घेत आहेत.