गडचिरोलीत प्रवेशबंदी केल्याने सीमावर्ती शेतकऱ्यांचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 07:00 PM2020-07-08T19:00:32+5:302020-07-08T19:03:33+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना थेट गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश नाकारला. त्यामुळे सात गावातील संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी वैनगंगा नदी पुलावर ब्रह्मपुरी-वडसा मार्गावर दीडतास चक्का जाम आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: ब्रह्मपुरी शहरात कोरोनाचा रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना थेट गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश नाकारला. त्यामुळे सात गावातील संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी वैनगंगा नदी पुलावर ब्रह्मपुरी-वडसा मार्गावर दीडतास चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी दूध, दही, भाजीपाला विक्री व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहरात दररोज ये-जा करतात.
नागपूर शहरातून जीवनावश्यक वस्तू घेवून येणारी वाहने ब्रह्मपुरी मागार्नेच वडसा शहरात प्रवेश करतात. मात्र, ब्रह्मपुरीत कोरोना रूग्ण आढळताच गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वैनगंगा नदीपूल ओलांडून ८ किमी अंतरावरील वडसा शहरात प्रवेशबंदी लादली. परिणामी ब्रम्हपुरी तालुक्यातील हरदोली, चिंचोली, चिखलगाव, लाडज, सोंद्री, सोनेगाव, सावलगाव येथील शेतकऱ्यांना दूध, दही, भाजीपाला व अन्य शेतमाल वडसा शहरात विकण्याचा मार्ग बंद झाला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी वैनगंगा पुलावर झाडे, लाकूड व दगड टाकून चक्काजाम आंदोलन सुरू केले. यानंतर वडसा तहसीलदार, मुख्याधिकारी, ब्रह्मपुरी तहसीलदार विजय पवार, वडसा व ब्रम्हपुरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन देताच मार्ग मोकळा केला.
सात गावांमध्ये कोरोनाचा रूग्णच नसताना बंदी का ?
वैनगंगा नदीकिनारी वसलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील सात गावांची नाळ गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहराशी जोडली आहे. या शहरातील बाजारपेठेत दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरू असते. हरदोली, चिंचोली, चिखलगाव, लाडज, सोंद्री, सोनेगाव, सावलगाव येथे कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही. त्यामुळे गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट प्रवेशना कारणे अन्यायकारक आहे, अशी नाराजी शेतकऱ्यांनी लोकमतजवळ व्यक्त केली.