ओबीसी जनगणनेसाठी आता हॅशटॅगच्या माध्यमातून आंदोलन; चंद्रपुरातून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:34 PM2023-01-17T12:34:33+5:302023-01-17T12:34:56+5:30
प्रजासत्ताकदिनी पाठविले जाणार सोशल मीडियावरून मेसेज
चंद्रपूर : ओबीसी समाजाची जनगणना करावी, यासाठी चंद्रपुरात मोठे जनआंदोलन उभे केले जात आहे. दरम्यान, ओबीसी सेवा संघाच्या वतीने येत्या प्रजासत्ताकदिनी हॅशटॅगच्या माध्यमातून सोशल मीडियावर मेसेज पाठविले जाणार आहेत. यासाठी चंद्रपुरातून सुरुवात झाली असून जनजागृतीही केली जात आहे.
‘हॅशटॅग ओबीसी जनगणना झालीच पाहिजे’, ‘हॅशटॅग व्हॅाईस फाॅर ओबीसी सेंसर’, या प्रकारे हॅश टॅगच्या माध्यमातून आंदोलन केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना टॅग केले जाणार आहे. फेसबुक, व्हाॅटस्ॲप, इन्स्टाग्राम तसेच ट्वीट केले जाणार आहे. यासंदर्भात ओबीसी सेवा संघाने विविध ठिकाणी बैठका घेणे सुरू केले असून गावागावात यासाठी जनजगृती सुरू केली आहे.
व्हाट्सअॅपच्या माध्यमातून मेसेज
ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, यासंदर्भातील मेसेज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, अजित पवार, ओबीसी खासदार, आमदारांना ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॅाटस्ॲपच्या माध्यमातून मेसेज पाठवून आंदोलन केले जाणार आहे.
ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, यासाठी विविध मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. राज्यभर आंदोलन व्हावे यासाठी सध्या जनजागृती सुरू करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी राज्यभर विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून हॅशटॅग ओबीसी जनगणना झालीच पाहिजे. असे मेसेज पाठविले जाणार आहे. यानंतरही शासनाला जाग आली नाही तर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.
- प्रा. अनिल डहाके, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, चंद्रपूर