कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2017 12:35 AM2017-05-01T00:35:49+5:302017-05-01T00:35:49+5:30
शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर विकास कामासाठी पैसेच राहणार नाही,
विजय वडेट्टीवार : ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा
चंद्रपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर विकास कामासाठी पैसेच राहणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करणार, असे म्हणून शेतकऱ्यांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मात्र काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कर्जमाफी मिळेपर्यंत पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे उपगट नेता आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रह्मपुरी येथे शनिवारी तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे, स्मिता पारधी, प्रमोद चिमूरकर, सतीश वारजूरकर, गजानन बुटके, पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, नगर परिषद उपाध्यक्ष रश्मी खानोरकर, नगरसेविका फुलझले, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मंगला लोनबले, माजी नगरसेवक विलास विखार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन उराडे यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
आ. वडेट्टीवार म्हणाले, निसर्गाची अवकृपा, शेतमालाला भाव नाही अशा अस्मानी संकटाच्या कचाट्यात अडकून शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. गेल्या अडीच वर्षात आठ हजार पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेली आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरी सुद्धा भाजप सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असे ते म्हणाले.
या मेळाव्यात नवनिर्वाचित जि. प. सदस्य राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, प. स. सदस्य थानेश्वर कायरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, महिला तालुका काँग्रेस अध्यक्षा मंगला लोनबले, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष व सर्व काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)