आंदोलनकर्त्या दीडशे कामगारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:54 AM2017-10-12T00:54:36+5:302017-10-12T00:54:49+5:30
मोहबाळा गावालगत असणाºया एमआयडीसीमधील साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनीतील इन्कॉटेक कंपनीने कोणतेही कारण नसताना दीडशे कामगारांना कामावरून कमी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मोहबाळा गावालगत असणाºया एमआयडीसीमधील साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनीतील इन्कॉटेक कंपनीने कोणतेही कारण नसताना दीडशे कामगारांना कामावरून कमी केले. त्यामुळे उपासमारीचे जीवन जगत असलेल्या कामगारांनी बुधवारी प्रहार विद्युत कामगार संघटनेचे महासचिव बाळकृष्ण जुवार व प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल डुकरे यांच्या नेतृत्वात बुधवारला बेमुदत ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेकडो आंदोलकांची अटक व सुटका करण्यात आली.
साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी गेल्या आठ वर्षांपासून कोळशापासून वीज निर्मितीचे काम करीत आहे. या कंपनीत निरनिराळ्या तांत्रिक पदावर कामगार कार्यरत असून कंपनीत अनेक सह कंपन्या कार्यरत आहेत. यातील चेन्नई राधा या कंपनीचा कंत्राट संपुष्टात आल्यामुळे ३० जून २०१७ पासून इन्कॉटेक कंपनी काम करीत आहे. इन्कॉटेक कंपनीने सर्वच कंत्राटी कामगारांच्या मुलाखती घेऊन कामगारांना कामावर घेण्यात येईल, असा नोटीस कंपनीच्या नोटीस बोर्डवर लावला होता. कामगारांच्या हुद्दा प्रमाणे १५ व १६ जुलैला मुलाखती ठेवल्या. पण कुठलीही मुलाखत न घेता २१ जुलैपासून १५० स्थानिक कामगारांना कंपनीने प्रवेश बंद केला होता. आतापर्यंत अनेक निवेदने देऊनही कंपनी प्रशासन कामगारांना घेण्यास तयार नसल्याने ३ महिन्यांपासून कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.
प्रशासनाकडे दाद मागून कुठलाही तोडगा न निघाल्याने बुधवारला कामगारांनी बेमुदत आंदोलन पुकारले. सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या या आंदोलनात १५० कामगार सहभागी झाले होते. कामगारांनी मुख्य प्रवेश द्वारावरच ठिय्या आंदोलन सुरु केल्याने सकाळ पाळीतील कामगार कंपनीत प्रवेश करू शकले नाही. जो पर्यंत सर्व कामगारांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा, निर्णय आंदोलकांनी घेतला. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. यावेळी अमोल डुकरे, बाळकृष्ण जुवार, अमित निब्रड, सुरज घुमे, नितीन नागरकर, समीर पाटील, राम घोगरे, किरण जोगी, प्रशांत भोयर, अशोक चिकटे, संतोष बुटले, विवेक लभाने, सुशील पिंपळकर, अशोक चिकटे व इतर कामगार व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.