वृक्षलागवडीसाठी गायत्री परिवारासोबत करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:29 PM2018-11-30T23:29:02+5:302018-11-30T23:29:19+5:30
गायत्री परिवाराने महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवड मोहिमेत यापूर्वीही मोठे योगदान दिले आहे. यापुढेही गायत्री परिवाराचे वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये वनविभागामार्फत सहकार्य घेतले जाईल. त्यासाठी लवकरच परस्पर सामंजस्य करार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गायत्री परिवाराने महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवड मोहिमेत यापूर्वीही मोठे योगदान दिले आहे. यापुढेही गायत्री परिवाराचे वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये वनविभागामार्फत सहकार्य घेतले जाईल. त्यासाठी लवकरच परस्पर सामंजस्य करार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील पंच-सरपंच मेळाव्याचे गायत्री परिवाराने आयोजन केले होते. या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. हरिद्वार येथील शांती कुंज गायत्री परिवारमार्फत चंद्रपूरमध्ये दाताळा रोड येथे जिल्ह्यातील पंच- सरपंच व युवा संगोष्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, गायत्री परिवाराचे हरिद्वार येथील योगेंद्र गिरी, नागपूर छत्रपती योगीराज बल्की, सुनील शर्मा, भास्कर पेरे पाटील, पर्यावरण तज्ज्ञ सुरेश राठी, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नामदेव डाहुले आदी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले, देशाला बळकट करण्यासाठी प्रत्येक गावाचे दायित्व असले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या देशात रामराज्य आले पाहिजे, असे वाटते. मात्र यासाठी प्रत्येक गावाने नव्हे, तर प्रत्येक गावातील, प्रत्येक व्यक्तीने आपले दायित्व देणे महत्त्वाचे आहे. मानवाच्या जन्मात आल्यानंतर त्याचे जगणे त्यागी असले पाहिजे. हा देश त्यागाची भूमी म्हणून ओळखला जातो. स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगण्याची जी संकल्पना गायत्री परिवाराने समाजात रुजविली आहे, त्या संकल्पनेचा त्यांनी यावेळी गौरव केला. राज्य शासनाने यापूर्वी राबविलेल्या वृक्ष लागवडीमध्ये गायत्री परिवाराने मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी गायत्री परिवाराचे सदस्य आहे. त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आगामी ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये गायत्री परिवारासोबत वनविभाग राज्यस्तरीय सामंजस्य करार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सूतोवाच केले. वृक्ष लागवडीमध्ये गायत्री परिवारांनी आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.