कृषी विद्यापीठ सिंदेवाहीतच हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:33 AM2018-11-02T00:33:43+5:302018-11-02T00:34:24+5:30
सिंदेवाही येथील कृषी संशोधन प्रकल्पाला १०७ वर्षे पूर्ण झाली असून या केंद्राने आजवर विविध वाण विकसित केले आहेत. त्याचा गौरव म्हणून सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ होणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : सिंदेवाही येथील कृषी संशोधन प्रकल्पाला १०७ वर्षे पूर्ण झाली असून या केंद्राने आजवर विविध वाण विकसित केले आहेत. त्याचा गौरव म्हणून सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ होणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांनी या विद्यापीठाला वाट्टेल ते नाव द्यावे, पण सिंदेवाहीकरांची ही मागणी पूर्ण करावी, असे झाल्यास मी पालकमंत्र्यांचा कुठेही जाहीर सत्कार करायला तयार असल्याचे प्रतिपादन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय कृषी संशोधन केंद्र कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही येथे बुधवारी धान महोत्सव कृषी मेळावा, कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार विजय वडेट्टीवार बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. प्रमुख अतिथी म्हणून जैनुद्दीन जव्हेरी, स्रेहा हरडे, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, सचिन नाडमवार, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, डॉ. डी. एम. मानकर, कुलसचिव डॉ प्रकाश कडू, डॉ. उदय पाटील, सभापती मधुकर मडावी, रमाकांत लोधे, उपसभापती मंदा बाळबुध्दे, चंद्रशेखर चन्ने, अरूण कवठे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. खर्चे यांनी केले. कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त संपूर्ण कृषी विद्यापीठांनी केलेल्या विविध संशोधनाने शेतकऱ्यांच्या प्रगतीस सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. यावेळी तीन घडीपत्रिकेचे विमोचनसुध्दा करण्यात आले. त्यानंतर जैनुद्दीन जव्हेरी म्हणाले, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, त्यामुळे शेतकºयांना आपली उन्नती करता येईल.
डॉ. विलास भाले यांनी काही विद्यापीठांनी केलेल्या कार्याची माहिती सांगून शेतकºयांनी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच विभागीय केंद्राने प्रक्षेप क्षेत्रामध्ये ६०० वाणांची लागवड करण्याची किमया करून दाखवल्याचे सांगितले. या कार्यक्रमात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.