जिल्हा परिषदेला दहा हजारामध्येच करावा लागणार कृषी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 02:43 PM2020-06-24T14:43:43+5:302020-06-24T14:44:11+5:30
राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेला १० हजार तर पंचायत समितीला केवळ ५ हजारात हा कार्यक्रम साजरा करावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली कामगिरी लक्षात घेऊन १ जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दिन साजरा करण्याची शासनाने परवानगी दिली असून खर्चाची मर्यादाही आखून दिली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेला १० हजार तर पंचायत समितीला केवळ ५ हजारात हा कार्यक्रम साजरा करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील उपलब्ध अनुदानातच हा खर्च भागवावा लागणार आहे.
कृषी दिन साजरा साजरा करण्याबाबत राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. यामध्ये खरीप हंगाम सुरु असल्यामुळे राज्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन, बांधावर जावून पीक निरीक्षक, गावागावांत शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती द्यावी लागणार आहे. कृषी विभागाला यासंदर्भात आराखडा तयार करावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम साजरा करावा लागणार आहे.
कृषी दिन साजरा करण्यासाठी राज्यातील ३५५ पंचायत समितींकरिता १७ लाख ७५ हजार रुपये तसेच ३४ जिल्हा परिषदेला ३ लाख ४० हजार रुपये अशा एकूण २१ लाख १५ हजार रुपयांच्या खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे.
अधिकारी, पदाधिकाऱ्यांची कसरत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कार्यक्रम करण्यास तसेच खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. मात्र पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांना या अल्प खर्चात कार्यक्रम करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.