खरिपासाठी कृषी विभागही गुंतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:20 PM2019-05-30T22:20:01+5:302019-05-30T22:20:41+5:30
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १७ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. खरीप हंगामाच्या कामाला वेग आला असून जिल्ह्यातील शेतकरी पूर्वमशागतीच्या कामात गुंतलेला आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाचे फळ भरघोस उत्पादनाच्या स्वरूपात मिळावे, यासाठी कृषी विभागही कामाला लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १७ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. खरीप हंगामाच्या कामाला वेग आला असून जिल्ह्यातील शेतकरी पूर्वमशागतीच्या कामात गुंतलेला आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाचे फळ भरघोस उत्पादनाच्या स्वरूपात मिळावे, यासाठी कृषी विभागही कामाला लागला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत विविध सूचना शेतकºयांना सातत्याने करण्यात येत आहेत. या सूचना तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकºयांपर्यंत पोहचविल्या जात आहेत.
मागील वर्षीचे सुखदु:ख विसरून आता शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र हंगामासाठी शेतकºयांना पैसा हवा आहे. कर्जाची जुळवाजुळव शेतकºयांनी सुरू केली आहे. यासोबत बियाण्यांसाठीही शेतकरी धडपड करताना दिसत आहे. पाऊस दरवर्षीच दगा देतो, हा अनुभव पाठिशी असल्यामुळे पेरणी केव्हा करावी, या विवंचनेत शेतकरी दिसत आहेत. त्यामुळे त्यांना सल्ला देण्यासाठी कृषी विभाग तत्पर झाला आहे. दर्जेदार बियाणे, जमिनीची योग्य मशागत, मान्सूनच्या आगमनानंतरच पेरणीचे नियोजन, बीज प्रक्रिया व योग्य खत व्यवस्थापन, कीड व रोगांपासून पिकांचे संरक्षण याच पंचसूत्रीमुळे शेतकºयांना खरीप हंगामात भरघोस उत्पादन घेता येऊ शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निसंकोचपणे कृषी विभागाच्या अधिकाºयांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केलेले आहे.
अशा आहेत सूचना
कृषी विभागामार्फत दिलेल्या आरोग्य पत्रिकेतील सूचनांप्रमाणे खत व्यवस्थापन करावे व जमिनीची सुपीकता वाढवावी, बीज, खते तसेच कीटकनाशके व बुरशीनाशके खरेदी करताना दक्षता घ्यावी. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाºयांचा सल्ला घ्यावा. बीजप्रक्रियांची प्रात्यक्षिके बघून पीक पेरणीच्या वेळेस बुरशीनाशक जिवाणू खते यांची बीजप्रक्रिया करावी. कपाशीवरील शेंद्री बोंड आळीचा नायनाट करण्यासाठी जमिनीची योग्य पूर्वमशागत तसेच निंबोळी अर्काचा वापर करावा व एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे. यात कामगंध सापळे, ट्रायकोकार्ड यांचाही वापर करावा. मुख्य पिकात आंतरपीक घ्यावे. कीड व रोग व्यवस्थापनासाठी शक्य असेल तोपर्यंत सेंद्रिय तसेच विषमुक्त निविष्ठांचा वापर करावा. रासायनिक निविष्ठांची हाताळणी व फवारणी करताना काळजी घ्यावी. अशा विविध शेतीपयोगी सूचना कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे.
असे केले जात आहे मार्गदर्शन
कृषी विभागामार्फत यावर्षी २५ मे ते ८ जून या कालावधीत उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवाडा साजरा करण्यात येत असून याअंतर्गत विविध मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. यामध्ये शेतीशाळा, मार्गदर्शन कार्यशाळा, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यावर भर दिला जात आहे. यामुळे शेतकºयाला योग्य मार्गदर्शन मिळत आहे.
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना वारंवार सूचना केल्या जात आहे. शेतकºयांनी या सूचनांचे पालन करुन यावर्षीच्या हंगामाचे नियोजन करावे.
-डॉ.उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी