शेतकऱ्यांनो, ८० ते १०० मि.मी पाऊस पडला तरच करा पेरणी
By राजेश मडावी | Published: June 27, 2023 02:42 PM2023-06-27T14:42:40+5:302023-06-27T14:43:56+5:30
कृषी विभागाचे आवाहन : गतवर्षी २६ जूनपर्यंत ७८ मिमी तर यंदा फक्त ४१ मिमी पाऊस
चंद्रपूर : कृषी हवामान व सल्ल्यानुसार जिल्ह्यात २६ ते २८ जून २०२३ पर्यंत आकाश ढगाळ राहून सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वातावरणातील बदलामुळे मॉन्सूनचे जिल्ह्यातील आगमन उशिराने झाले. ८० ते १०० मि.मी पाऊस पडला तरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले. गतवर्षी २६ जूनला ७८ मिमी पाऊस पडला होता. मात्र, यंदा केवळ ४१ मि. मी पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ४ लाख ९० हजार हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन आहे. यात प्रत्येकी १ लाख ८७ हजार हेक्टर भात पिक व कापूस तर ८० हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचा पेरा राहील. हवामान विभागाच्या या अंदाजानुसार २५ जूननंतर अरबी समुद्रवरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करु नये, ८० ते १०० मि.मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये.
शासनाकडून महावेध प्रणालीमार्फत जिल्ह्यासाठी प्राप्त दैनिक पर्जन्यमान अहवालानुसार वरोरा तालुक्यातील टेमुर्डा, खांबाडा, चिमूर तालुक्यातील खडसंगी, भिसी, मासळ, राजुरा तालुक्यातील विरुर स्टे. व कोरपना तालुक्यातील कोरपना व गडचांदूर याच महसूल मंडळामध्ये ७५ ते १०० मिमी पर्यंत पर्जन्यमान झाल्याची नोंद असली तरी सलग तीन दिवस पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे या व इतर महसूल मंडळांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याची खात्री करुनच पेरणी करावी.
असे करा पीक नियोजन
८० ते १०० मि.मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने धूळ पेरणी करू नये. पेरणी करताना २० टक्के जादा बियाणांचा वापर करावा. सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने (बीबीएफ) पेरणी करावी. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन (मल्चींग) सारख्या तंत्राचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले.