कृषी अधिकाऱ्यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला
By Admin | Published: June 21, 2014 11:54 PM2014-06-21T23:54:59+5:302014-06-21T23:54:59+5:30
सध्या शेती हंगामाचे दिवस आहे. धान व सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत. याच गर्दीचा व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी
पक्के बिल घ्यावे : बोगस बियाणांची तक्रार करा
देवाडा (खुर्द) : सध्या शेती हंगामाचे दिवस आहे. धान व सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत. याच गर्दीचा व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी केंद्र संचालकांकडून बोगस बियाणे शेतकऱ्यांना दिल्या जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे अधिकृत परवानाधारक केंद्रातूनच खरेदी करावे, बियाणे खरेदी करताना कृषी केंद्र धारकांकडून पक्की पावती घ्यावी, अशी विनंती तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी सुशांत गाडेवार यांनी केली आहे.
बियाणे पेरणी करण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने बियाणांची उगवण शक्ती तपासून पाहावी व त्यानंतरच पेरणी करावी. बियाणे खरेदी झाल्यानंतर शेतातील पीक निघेपर्यंत पक्के बिल व पिशवीवरील लेबल, टॅग जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. भविष्यात बियाणे उगवले नाही तर संबंधित कंपनीविरुद्ध पुरावा म्हणून याचा वापर करता येऊ शकतो. बियाणे पेरणी करताना मिठाच्या द्रावणात प्रक्रिया करून नंतर बुरशी नाशकाची प्रक्रिया करुनच बियाणाची पेरणी करावी. बियाणे पेरणीनंतर उगवण शक्तीबद्दल काही तक्रार असल्यास तालुका तक्रार निवारण समितीशी संपर्क साधावा. रासायनिक खतासोबत इतर साहित्य देण्यास कृषी केंद्र धारकांनी सक्ती केल्यास त्याची तक्रार तालुका भरारी पथकाकडे करावी.
खरीप हंगाम सुरू असल्यामुळे काही कंपन्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेतात. त्यामुळे त्यांची तक्रार करावी, परवाना धारक कृषी केंद्राकडूनच बियाणे खरेदी करावी, असे तालुका कृषी अधिकारी गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी सुशांत गाडेवार यांनी पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)