बल्लारपूर तालुक्यात कृषी संजीवनी मोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:20 AM2021-06-25T04:20:37+5:302021-06-25T04:20:37+5:30
बल्लारपूर : तालुका कृषी विभागामार्फत बल्लारपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये २१ जून ते १ जुलैपर्यंत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत ...
बल्लारपूर : तालुका कृषी विभागामार्फत बल्लारपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये २१ जून ते १ जुलैपर्यंत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. २१ जूनला नांदगाव पोडे, हडस्ती व दहेली या गावांमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेंतर्गत कृषी अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देऊन कृषी विभागाच्या विविध योजना तसेच कृषी तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल आदी विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे.
मौजा दहेली येथे तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी बी. एस. सलामे, कृषी सहायक राहुल अहिरराव यांच्या उपस्थितीत तेजराज उरकुडे यांच्या शेतात सोयाबीन पिकाचे रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच मौजे नांदगाव पोडे व हडस्ती येथे कृषी सहायक निखिल पिंपळशेंडे यांनी शेतकऱ्यांना रुंद वरंबा सरी व बीज प्रक्रियेविषयक माहिती दिली.