सोलर करंट प्रणाली वाचविणार शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:38 AM2018-10-05T00:38:04+5:302018-10-05T00:38:33+5:30
वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोशल अक्शन फॉर रुरल डेवलपमेंट (सार्ड) संस्थेच्या वतीने ‘सोलर करंट प्रणाली’ या विषयावर भद्रावती तालुक्यातील पारोधी येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ही प्रणाली पिके वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोशल अक्शन फॉर रुरल डेवलपमेंट (सार्ड) संस्थेच्या वतीने ‘सोलर करंट प्रणाली’ या विषयावर भद्रावती तालुक्यातील पारोधी येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ही प्रणाली पिके वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राहुल बल्की व सार्डचे अध्यक्ष प्रकाश कामडे यांनी विषयाची व्यापक मांडणी केली.
सध्या शेतकºयांच्या शेतात कापूस, तूर, सोयाबीन, धान पिके उभी आहेत. जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. डुक्कर हा प्राणी पिकांचे नुकसान करण्यास सर्वाधिक कारणीभूत आहे. अनेक शेतकºयांचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कामडे यांना ही माहिती मिळताच त्यांनी राहुल बलकी यांना सोबत घेऊन पारोधी गाव गाठले. शेतकऱ्यांना एकत्र करून ‘सोलर करंट प्रणाली’ ची माहिती दिली. अवैध विद्युत प्रवाह शेतात सोडल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात. छोटीशी चूक झाल्यास संपूर्ण कुटुंबाला कसा त्रास होतो. शेतीचे नुकसान होते. सुरक्षा प्रणालीनुसार गेजचा एक तार जमिनीपासून दीड फूट उंचीवर बांधावा लागतो. सोबतच एक बॅटरी लावावी लागते. यासाठी तीन हजार व सोलर पॅनलासाठी दीड हजार रुपये असे एकूण पाच हजार रूपयांचा खर्च येतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही हा खर्च करणे शक्य आहे. ‘सोलर करंट प्रणाली’ मुळे शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करता येऊ शकते. शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारुन शंका दूर केल्या. यंत्रण लावण्याची पद्धत, बॅटरी चार्ज, तार व सोलर प्लेट लावताना कशी दक्षता घ्यावी, यासंदर्भात शेतकऱ्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी संतोष कामडे, संजय रामटेके, प्रेमचंद कामडे, मनोज आसूटकर, भालचंद्र शेम्बळकर, गोपीचंद कामडे, आशिष विरुटकर, नितीश विरुटकर, आकाश कामडे, उत्तम खिरटकर, नगाजी कुडलकर, नामदेव रामटेके, आनंदराव गिरसावळे उपस्थित होते.