सर्वेक्षणासाठी कृषी पथक शेतशिवारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:19 PM2018-02-14T23:19:00+5:302018-02-14T23:19:26+5:30

Agriculture for the survey | सर्वेक्षणासाठी कृषी पथक शेतशिवारात

सर्वेक्षणासाठी कृषी पथक शेतशिवारात

Next
ठळक मुद्देतोंडचा घास हिरावला : अवकाळी पाऊस व गारपीट

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : सोमवारी रात्री आणि मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिके भुईसपाट झाली आहे. आधीच मेटाकुटीस आलेला बळीराजा यामुळे रडकुंडीला आला आहे. परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मंगळवारी दिले. आदेशानुसार बुधवारपासून महसूल व कृषी विभागाचे पथक शेतशिवारात जाऊन पिकांचे सर्व्हेक्षण करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच-सहा दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला होता. ढगाळ वातावरण कायम होते. अशातच सोमवारी रात्री जिल्ह्यातील काही तालुक्यात गारपीटीसह पाऊस बरसला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा अवकाळ पाऊस गारपीटीने जिल्ह्याला झोडपून काढले. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सिंदेवाही तालुक्यातील एका गावात, वरोरा तालुक्यात ३० गावामध्ये, भद्रावती तालुक्यात ४ गावांमध्ये तर राजुरा तालुक्यात ३ गावांमध्ये गारपीट झाल्याची माहिती आहे. गारपीटीमुळे धोपटाळा येथे एक गाय व वासरु मृत्यूमुखी पडले. मुधोली, वडाळा, आष्टा, मानोरा, मारडा, धिडसी, निरळी, चिकणी, माढेळी, टेंभुर्डा आदी गावांमध्ये गारपीट झाली. तर वीज कोसळून महालगाव येथे एका बैलाचा मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील चरूर (खटी), एकोना, वनोजा, मार्डा, चिनोरा, सालोरी, आबामक्ता, वडगाव, चारगाव या गावांसह ३० गावातील पीक उद्धवस्त झाली आहेत. रबी पिकांमध्ये हरभरा व गहू पिकाला सर्वाधिक फटका बसला असून गहू पीक पूर्णत: जमिनीवर झोपून गेले तर हरभऱ्याचे दाणे फुटून पडले आहेत. तर भाजीपाला व आंब्याचा बहारही जमीनदोस्त झाला आहे. शेतामध्ये उभ्या झाडांना कापूस दिसेनासे झाले आहे. बल्लापूर तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती, चारवट, बामणी (दुधोली), दहेली, लावारी, कळमना, आमडी, पळसगाव, किन्ही, कोठारी, काटवली (बामणी), इटोली, मानोरा, कवडजी, मोहाळी, कोर्टिमक्ता येथील शेतकºयांना मोठ्या फटका बसला आहे. यंदा वारंवार शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप होत आहे. खरिपात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पीक उद्ध्वस्त झाले होते.
राजुरा तालुक्यात शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्त
गोवरी : सोमवार आणि मंगळवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीने कापूस, गहू, हरभरा, ज्वारी ही पिके पुर्णत: भुईसपाट झाली आहे. राजुरा तालुक्याला वादळाचा चांगलाच फटका बसला असून शेतकरी पार कोलमडून पडला आहे. यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासूनच शेतीचे गणित चुकले. उसनवारी आणि बँकांचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी कसीबशी शेती केली. मात्र यावर्षी बोंडअळीने शेतकºयांच्या नाकीनऊ आणले. शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट बिघडला असतानाच दोन दिवसांपासून जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने राजुरा तालुक्याला झोडपून काढले. पीक निघायला फक्त काही दिवसाचा अवधी असतानाच निसर्गाच्या प्रकोपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. मारडा, गोवरी, पोवनी, साखरी, पेल्लोरा, धिडशी, वरोडा, चार्ली, निर्ली, कढोली, बाबापूर, चिंचोली परिसरातील शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
तिघांचे पथक
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हसनाबादे यांनीही आपल्या यंत्रणेला तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. प्रत्येक तालुक्यात तलाठी, ग्रामसेवक आणि तांत्रिक म्हणून कृषी सहायक या तिघांचे पथक प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शिवारात जात आहे. येत्या तीन दिवसात सर्व्हेक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपला अहवाल तहसीलदारांकडे देतील. त्यानंतर तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने सदर अहवाल कृषी अधीक्षक कार्यालयात सादर होऊन शासनाकडे पाठविला जाणार आहे.
कापसाच्या चिंध्या उडाल्या
यावर्षी कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी केली नव्हती. कापूस शेतातच होता. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी पावसाने झाडावरील कापसाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यात शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Agriculture for the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.