बल्लारपुरात अहीर यांचा नागरी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:14 AM2017-11-02T00:14:51+5:302017-11-02T00:15:02+5:30
जिल्ह्यातील प्रवाशांची गरज लक्षात घेवून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पुणे-काजीपेठ साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करून दिवाळीची भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : जिल्ह्यातील प्रवाशांची गरज लक्षात घेवून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पुणे-काजीपेठ साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करून दिवाळीची भेट दिली. या रेल्वेगाडीने व्यापारी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांची समस्या दूर झाली. रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिल्याने चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने ना. हंसराज अहीर यांचा पुणेरी फेटा, शाल, श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार बंटी भांगडिया, नगराध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष मीना चौधरी, जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, अब्दुल रफीक, विकास राजूरकर, संजय कापरकर, डॉ. श्याम हिवरकर, श्रीनिवास कंदकुरी, शंकर बुद्धार्थी आदींची उपस्थिती होती.
पुणे-काजीपेठ साप्ताहिक एक्स्प्रेस पुणे येथून सुटल्यानंतर दौड, अहमदनगर, पुलगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, शिरपूर, कागजनगर, पेदापल्ली आदी १८ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला. या रेल्वेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे परिवर्तन होणार आहे. ही एक्स्प्रेस दररोज धावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करू, असे आश्वासन यावेळी ना. अहिर यांनी दिले़ ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात येतील. पुणे-काजीपेठ एक्स्प्रेसचा मोठा उपयोग होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. संचालन श्रीनिवास सुंचुवार यांनी केले. आभार शंकर बुध्दार्थी यांनी मानले.