वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:11 AM2018-04-06T00:11:16+5:302018-04-06T00:11:16+5:30
देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश आहे. येथील प्रदूषणाबाबत नेहमीच चर्चा होते. परंतु, प्रदूषण नेमके कसे व किती आहे, त्याचा मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काय परिणाम होतो, ..
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश आहे. येथील प्रदूषणाबाबत नेहमीच चर्चा होते. परंतु, प्रदूषण नेमके कसे व किती आहे, त्याचा मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काय परिणाम होतो, याबाबत कुणालाही फारशी माहिती नाही. त्यामुळे नागरिकही याकडे दुर्लक्ष करतात. मात्र चंद्रपुरातील जलबिरादरी संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणातून चंद्रपुरातील वायू प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे श्वास घेणेही धोक्याचे बनले असून भयंकर परिणाम जाणवणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आहेत. या उद्योगातून होणारे वायू प्रदूषण नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी चंद्रपुरात प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे. मात्र ‘आॅल इज वेल’ म्हणत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उद्योगांना धूर ओखण्यासाठी परवानगी देत असल्याने उद्योगांचे वायू प्रदूषण चंद्रपूरकरांच्या जीवावर उठले आहे. जलबिरादरी संस्थेने तुकूम येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील औद्योगिक रसायनशास्त्राचे प्रा. डॉ. डी. टी. कोसे यांच्या मार्फत वायू प्रदूषणाचा एक सर्वेक्षण अहवाल तयार केला. या अहवालातील प्रदूषणाच्या नोंदणीची आकडेवारी समोर आल्यानंतर चंद्रपुरातील वायू प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडल्याचे पुढे आले आहे.
सर्वसामान्यपणे साध्या डोळ्यांना वाहनांमधून किंवा कारखान्यातून जो धूर निघताना दिसतो किंवा छोटे-छोटे धुळीचे कण दिसतात, त्यांनाच आपण हवेचे प्रदूषण असे म्हणतो. परंतु, साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या सुक्ष्म व अतिसुक्ष्म घन तसेच द्रव्य पदार्थाबद्दल नागरिकांना माहिती नाही. डोळ्यांना न दिसणाºया परंतु वातावरणाला तीव्र स्वरूपात प्रदूषित करून आजारांना निमंत्रण देणारे वायू प्रदूषण पी. एम. २.५ पेक्षा जास्त असू नये. परंतु चंद्रपूर शहरातील वायू प्रदूषणाची नोंद घेतली असता, दररोजचे वायू प्रदूषण पी. एम. १५० ते २५० पर्यंत गेले आहे. यावरून चंद्रपुरातील हवा मानवी जीवनास अत्यंत धोकादायक बनली आहे. शहरात पीएम २.५ चे प्रमाण किती आहे, याबाबत ४ ते १२ मार्च दरम्यानच्या काळात घेतलेल्या आकडेवारीवरून वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मानवी केसांच्या जाडीपेक्षाही बारीक कण
पी. एम. २.५ म्हणजे वातावरणात असलेले धुलीकरण ज्यांचा आकार २.५ मायक्रॉन आहे. मानवी केसांची जाडी साधारणत: ५० ते ७० मायक्रॉन असते. मात्र मानवी केसांच्या जाडीपेक्षा २० ते २८ पटीने कमी असलेल्या धुलीकनांना पी. एम. २.५ असे म्हटले जाते. यामध्ये घन आणि द्रव्य रूपातील कार्बोनिक व अकाबोर्निक पदार्थ तसेच धातूंचे अतिसूक्ष्म कण इत्यादींचा समावेश होतो. या घटकांचे प्रमाण जास्त झाल्यास ते हवा प्रदूषणााठी कारणीभूत ठरतात.
कर्करोग होण्याची अधिक शक्यता
शहरी भागामध्ये व त्यातही औद्योगिक शहरी भागामध्ये पीएम २.५ चे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा फारच जास्त असते. कोळसा जाळणे, विविध प्रकारचे इंधन, नैसर्गिक गॅस, फ्लाय अॅशचे उत्सर्जन आणि विविध औद्योगिक प्रक्रिया हे पीएम २.५ चे प्रमुख स्त्रोत आहेत. यामध्ये आयरन आक्साईड्स, कॅल्शियम आक्साईड्स, लीड हॅलाईड्स, अमोनियम सल्फेट्स, कॅल्शियम अक्साईडस तसेच पालीसायक्लिक अॅरोमॅटीक हायड्रोकार्बन हे कर्करोग निर्माण करणारे घटक असतात. त्यामुळे पीएम २.५ चे प्रमाण मर्यादित पातळी असणे गरजेचे आहे.