स्पंज आयर्न प्रकल्पांमुळे चंद्रपूरमध्ये वायुप्रदूषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 10:48 AM2022-04-16T10:48:29+5:302022-04-16T10:55:33+5:30

नागरिकांच्या जिवाशी खेळत असलेल्या या चार प्रकल्पांमध्ये ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी आयर्न ॲण्ड स्टील, सिद्धबली इस्पात व चमन मेटॅलिक्स यांचा समावेश आहे.

Air pollution in Chandrapur due to sponge iron projects | स्पंज आयर्न प्रकल्पांमुळे चंद्रपूरमध्ये वायुप्रदूषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

स्पंज आयर्न प्रकल्पांमुळे चंद्रपूरमध्ये वायुप्रदूषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next
ठळक मुद्देसर्दी, अस्थमा, कफ यासह श्वसनाचे आजार

आशिष रॉय

नागपूर : चंद्रपूर शहरातील जल व वायुप्रदूषणाला केवळ महानिर्मितीचा औष्णिक वीज प्रकल्पच कारणीभूत नाही. तडाली एमआयडीसीमधील चार स्पंज आयर्न प्रकल्पही चंद्रपूरमधील वायू विषारी करीत आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. सर्दी, अस्थमा, कफ यासह श्वसनाचे विविध आजार नागरिकांवर हल्लाबोल करीत आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोजलेल्या आरएसपीएम स्तरावरून संबंधित चार स्पंज आयर्न प्रकल्पामुळे किती घातक प्रदूषण होत आहे, हे स्पष्ट होते. तडाली एमआयडीसी येथील आरएसपीएम स्तर चंद्रपूर एमआयडीसी व चंद्रपूर शहरातील स्तरापेक्षा खूप जास्त आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळत असलेल्या या चार प्रकल्पांमध्ये ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी आयर्न ॲण्ड स्टील, सिद्धबली इस्पात व चमन मेटॅलिक्स यांचा समावेश आहे.

पर्यावरणप्रेमी सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हे चार उद्योग उभारले गेले. त्यावेळी या उद्योगांना परवानगी नाकारण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु देशमुख यांनी दुर्लक्ष केले. तडाली एमआयडीसीजवळच्या सहा-सात गावांमधील नागरिकांना वायुप्रदूषणामुळे श्वसनासंबंधीचे विविध आजार होत आहेत. चारही उद्योग वायुप्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योगांना केवळ नोटीस बजावते किंवा बँक हमी जप्त करते; परंतु ठोस कारवाई केली जात नाही.

पर्यावरणप्रेमी बंडू धोत्रे यांनी तडाली येथील उद्योग ग्रामीण भागातील प्रदूषण वाढवित असल्याचा आरोप केला. गावातील अनेक नागरिक या उद्योगांमध्ये काम करतात. त्यामुळे कोणीच लेखी तक्रार देत नाही. परिणामी, उद्योगांवर कारवाई होण्यासाठी काहीच करता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी विश्वास बुग्गेवार यांनी त्यांच्या पालकांना श्वसनाचे आजार झाल्याची माहिती दिली, तसेच स्वत:लाही कफ व सर्दी असल्याचे सांगितले. गेल्या २० वर्षांत शेतीचे उत्पादन कमी झाले आहे. कापूस काळा पडतो. त्यामुळे योग्य भाव मिळत नाही. शेती करणे सोडायचे आहे; पण चारही कंपन्या नोकरी देण्यास तयार नाहीत. या कंपन्या गावकऱ्यांसाठी शाप आहेत, असेही बुग्गेवार म्हणाले.

आरएसपीएम स्तर (मायक्रोग्रॅममध्ये)

वर्ष - चंद्रपूर एमआयडीसी - चंद्रपूर एसआरओ - तडाली एमआयडीसी

२०१७-१८ - ७४ - ९० - ११०

२०१८-१९ - ९० - ८९ - १०७

२०१९-२० - ८९ - ६८ - १०६

(मंजुरीयोग्य स्तर - ६०)

Web Title: Air pollution in Chandrapur due to sponge iron projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.