कोट्यवधींचे फटाके उडविल्याने चंद्रपूरकरांनी अनुभवली घुसमट; हवेची गुणवत्ता बाधीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 02:24 PM2023-11-15T14:24:19+5:302023-11-15T14:27:09+5:30
फटाक्यांचा आवाजासह धोकादायक रसायने वातावरणात
चंद्रपूर : दिवाळीनिमित्त रविवारी (दि. १२) लक्ष्मीपूजनानंतर चंद्रपुरात सुमारे दोन कोटींचे फटाके उडविल्याने नागरिकांची प्रचंड घुसमट झाली. त्या रात्री केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दर ताशी रात्री ९ वाजता घेतलेल्या निरीक्षणानुसार फटाक्यांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक श्रेणीत गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दरवर्षी दिवाळी उत्सवात फटाक्यांमुळे वातावरण प्रदूषण होते. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. मात्र, फटाका उडविण्याचा आनंद काही कमी होताना दिसत नाही. यंदा मनपाने कोनेरी तलावात फटका दुकानांसाठी जागा उपलब्ध करून दिली. रविवारी दिवसभर तेथील प्रत्येक दुकानात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. त्याच दिवशी कोनेरी तलावातील दुकानांत सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त रुपयांचे फटाके विकले गेले, अशी माहिती आहे. चंद्रपुरात अन्य भागांतही दुकाने लागल्याने विक्रीचा आकडा थक्क करणारा असावा. मात्र, अधिकृत आकडेवारी मिळू शकली नाही. यंदाही फटाक्यांमुळे चंद्रपूरची हवा गुणवत्ता अत्यंत खराब झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दर ताशी घेण्यात येणाऱ्या रात्री ९ वाजता घेतलेल्या निरीक्षणानुसार फटाक्यांमुळे हवा कमालीची प्रदूषित झाली. या प्रदूषणामुळे त्या परिसरातील नागरिकांना घुसमटीचा सामना करावा लागला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निरीक्षण काय सांगते?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणानुसार, चंद्रपुरातील १२ नोव्हेंबरला तासी सर्वाधिक हवा गुणवत्ता निर्देशांक ४५५ होता. धूलिकण २.५ चे प्रमाण ४२२ पर्यंत पोहोचले. मात्र, २४ तासांचा निर्देशांक २०३ हा प्रदूषित श्रेणीत आढळला. ११ नोव्हेंबरचा निर्देशांक १६९ तर १३ तारखेला निर्देशांक २४० होता. नोव्हेंबरमध्ये पहिले नऊ दिवस निर्देशांक साधारण प्रदूषण तर दिवाळीच्या दिवसात निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत होता. ऑक्टोबर महिन्यातही ३१ पैकी ३१ दिवस प्रदूषित होते.
आधीच चंद्रपूरची हवा खराब आहे. त्यातच फटाका प्रदूषणाने रविवारी स्थिती गंभीर झाली. फटाक्याने पर्यावरण दूषित होते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी नागरिकांना मोठा धोका संभवतो. फटाक्यांचा आवाज व त्यातील रसायने उदा. सल्फर, झिंक, कॉपर, सोडियम हे आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे श्वसनाचे रोग, त्वचा, हृदय व मानसिक रोग उद्भवतात. यावर पर्याय म्हणून पुढील वर्षी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी.
- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी, चंद्रपूर.