भद्रावतीमधील आठ गावांना हवा वरोरा तालुका
By admin | Published: July 10, 2014 11:31 PM2014-07-10T23:31:02+5:302014-07-10T23:31:02+5:30
भद्रावती तालुक्यातील आठ गावांना या तालुक्यातून वगळून वरोरा तालुका कार्यालयाशी जोडण्याची मागणी जोर धरत असून या मागणीच्या समर्थनार्थ भाजपाचे तालुका ग्रामीण सचिव रविंद्र धोटे आणि
कुचना : भद्रावती तालुक्यातील आठ गावांना या तालुक्यातून वगळून वरोरा तालुका कार्यालयाशी जोडण्याची मागणी जोर धरत असून या मागणीच्या समर्थनार्थ भाजपाचे तालुका ग्रामीण सचिव रविंद्र धोटे आणि माजी जि.प. सदस्य सुधीर उपाध्याय हे ग्रामस्थांची मागणी शासन दरबारी रेटणार आहेत.
तालुक्यातील कुचना, नागलोन, विसलोन, पळसगाव, पाटाळा, राळेगाव, मनगाव, थोराना ही आठ गावे असून या गावांचे तालुका मुख्यालय अंतर किमान १८ ते २५ किलोमिटर अंतरावर आहे. सरळ पोहोचण्यासाठी साधनांची उपलब्धता नाही. यामुळे शालेय शिक्षणासाठीचे दाखले, तहसीलची विविध कामे, शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती व उपयोगितेसाठी पंचायत समिती तथा कृषी विभागाची कार्यालये, तालुका न्यायालय तथा भूमी अभिलेख कार्यालयातील विविध विधी अथवा जमिनीचे खटले यासारख्या अनेक तालुका ठिकाणावरुन होणाऱ्या दैनंदिनी कामासाठी या गावातील नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागतो. एवढेच काय, नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीत या शेवटच्या टोकावरुन तालुक्याला मतदानासाठी जाणाऱ्या अनेक पदविधरांची अक्षरश: दमछाक झाली. यात बव्हंशी मतदारांनी आपली पदवी व पदव्यूत्तरांची समजदारी अनावश्यक त्रासापायी मतदान न करण्यातच आटोपली.
माजरी येथे सात वर्षांपूर्वी पोलीस ठाणे झाले. या ठाण्याचे वरिष्ठ कार्यालय वरोरा येथे आहे. एवढेच नव्हे तर शवविच्छेदनगृहसुद्धा वरोरा येथे आहे. मात्र गुन्ह्यांची नोंद केल्यानंतर या सर्व बाबी भद्रावती तालुक्याच्या न्यायकक्षेत येत असल्यामुळे नागरिकांबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडत आहे.
याशिवाय माजरी मार्गे भद्रावतीला जायचे म्हटले तर किमान दोन तास आधी निघावे लागते. कारण मधेच वणी आणि दक्षिण रेल्वे मार्ग असे दोन रेल्वेगेट पडतात आणि हे दोन्ही रेल्वे गेट हमखास किमान अर्धा ते पाऊण तास बंद असतात. त्यामुळे कित्येकांच्या कोर्टाच्या तारखाही चुकून जातात.
याशिवाय भद्रावती न्यायालय व तालुका कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालये बसस्थानकापासून दीड ते दोन कि.मी अंतरावर तर पंचायत समिती, कृषी कार्यालये भद्रावती शहरात किमान दोन- तीन कि.मी. अंतरावर यामुळे बस अथवा आॅटोने प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना या कार्यालयातील कामे उरकताना संध्याकाळ जाग्यावरच होतो. उल्लेखनीय वरील आठही गावातून सरळ राज्य परिवहन महामंडळाची बससेवा उपलब्ध नाही. यासाठी माजरी मार्ग किंवा वरोरावरुन भद्रावती असेच बसचे मार्ग आहेत. याशिवाय वर्धा नदी किनारी असलेल्या या गाववात पावळ्यात आपत्ती निवारणासाठीही तालुका कार्यालयाची दमछाक होते.
या तुलनेत वरोरा हे तालुका मुख्यालय किमान नऊ ते १५ कि.मी. अंतरावर असून ये- जा करण्यासाठी साधनांची उपलब्धता असते. याशिवाय वरोरा तालुक्यातील कार्यालये न्यायालय, पंचायत समिती, कृषी, उपनिबंधक कार्यालय, भूमिअभिलेख आदी सर्व विभाग पायदळ अंतरावर असून नागरिकांना कामे करताना कसलाही शारिरीक त्रास होत नाही. रविंद्र धोटे आणि सुधीर उपाध्याय यांनी ग्रामस्थांची स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून लवकरच संबंधित ग्रामपंचायतीमधून ग्रामसभेचा ठराव संमत करून हे स्वाक्षरी निवेदन व ठरावाच्या प्रति जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याच्या मुख्यमंत्र्याना पाठविणार असल्याची माहिती ‘लोकमत’ ला दिली. (वार्ताहर)