स्वच्छ प्रतिमेचा अजातशत्रू राजकारणी हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:19 PM2018-09-24T23:19:50+5:302018-09-24T23:20:04+5:30
शांत व संयमी स्वभाव आणि स्वच्छ प्रतिमेने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात अमीट छाप पाडणारे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे हे खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते. काही वर्षांपासून प्रकृती अस्वस्थाने त्रस्त असले तरी महत्त्वाच्या कार्यक्रमात त्यांची हजेरी लक्ष वेधणारी अशीच होती. राजबिंडा व्यक्तिमत्व लाभलेल्या शांतारामजींच्या चेहºयावर आयुष्याच्या सांजवेळीही स्मीतहास्य कायम होते. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याने एका संयमी, शांत स्वभावाच्या धिरोदात्त राजकारण्याला गमावले आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेस एका पितृतुल्य अशा व्यक्तिमत्त्वाला तर चंद्रपूर जिल्हा एका स्वच्छ प्रतिमेच्या राजकारण्याला मुकला.
राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शांत व संयमी स्वभाव आणि स्वच्छ प्रतिमेने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात अमीट छाप पाडणारे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे हे खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते. काही वर्षांपासून प्रकृती अस्वस्थाने त्रस्त असले तरी महत्त्वाच्या कार्यक्रमात त्यांची हजेरी लक्ष वेधणारी अशीच होती. राजबिंडा व्यक्तिमत्व लाभलेल्या शांतारामजींच्या चेहºयावर आयुष्याच्या सांजवेळीही स्मीतहास्य कायम होते. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याने एका संयमी, शांत स्वभावाच्या धिरोदात्त राजकारण्याला गमावले आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेस एका पितृतुल्य अशा व्यक्तिमत्त्वाला तर चंद्रपूर जिल्हा एका स्वच्छ प्रतिमेच्या राजकारण्याला मुकला.
शांताराम पोटदुखे यांचा सार्वजनिक जीवनात संयुक्त महाराष्टÑ चळवळीतून प्रवेश झाला. तत्पूर्वी गोवा मुक्ती चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. पं. जवाहरलाल नेहरु, श्रीमती इंदिरा गांधी व यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. महाराष्टÑ राज्याच्या स्थापनेनंतर खºया अर्थाने काँग्रेस पक्षात ते सक्रिय झाले.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेसमध्ये कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, रा.कृ. पाटील, वि.तु. नागपुरे आणि मा. दा. तुमपल्लीवार या पहिल्या फळीतील नेत्यांसोबत त्यांनी काम केले. अ. शफी आणि वामनराव गड्डमवार यांच्यासोबत त्यांची जवळीक होती. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्यांनी मागितली होती. त्यावेळी संसदीय निवडणूक मंडळात मुलाखतीत वसंतराव नाईक व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी त्यांना सरळ प्रश्न विचारला, ‘तुमच्याखेरीज दुसरा कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो?’ क्षणाचाही विलंब न लावता ‘अॅड. एकनाथराव साळवे’ असे उत्तर त्यांनी दिले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. तो त्यांनी कायम जपला.
काँग्रेस पक्षाच्या १९६९ व १९७८ साली झालेल्या दोन्ही विभाजनात ते इंदिरा गांधी यांच्यासोबत राहिले. १९८० साली ते चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून विजयी झाले. सलग चारदा विजयी होऊन काँग्रेस पक्षाच्या पूर्वनिवडणूक वळणास छेद देणारे पहिले खासदार ठरले. पक्षांतर्गत गटबाजीत त्यांनी कधीच रस घेतला नाही. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व नेतृत्व यांची सतत साथसंगत केली. त्यामुळे नेहरु-गांधी नेतृत्वाचे पुरस्कर्ते अशी त्यांची प्रतिमा दिल्लीत होती.
माणसांची साखळी गुंफण्याची हातोटी आणि प्रचंड काम उपसण्याची कार्यक्षमता त्यांच्यात होती. काँग्रेस श्रेष्ठींजवळ त्यांचा सन्मान होता. स्वच्छ प्रतिमेचा सभ्य माणूस असे विरोधी पक्षातील अनेक नेते त्यांचे वर्णन करतात. केंद्रात अर्थराज्यमंत्री असताना डॉ. मनमोहनसिंग अर्थमंत्री होते. त्यावेळी अर्थखात्यात तीन राज्यमंत्री होते. कुप्रसिद्ध हर्षद मेहता शेअर घोटाळा याच काळात झाला. अर्थखात्यातील राज्यमंत्र्यांकडे संशयाची सुई जाहीररित्या फिरत होती. लालकृष्ण अडवाणी यांना भोपाळ येथे पत्रपरिषदेत शांताराम पोटदुखे यांचे सरळ नाव घेऊन प्रश्न विचारण्यात आला. ‘त्यांचा या घोटाळ्याशी काहीही संबंध नाही,’ असा स्पष्ट निर्वाळा अडवाणी यांनी दिला. ही त्यांच्या स्वच्छ प्रतिमेची पावती होती. शांताराम पोटदुखे हे सर्वोदय शिक्षण मंडळ व सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष होते. सर्वोदय शिक्षण मंडळाची पाच महाविद्यालये व सहा शाळा आहेत. १९९६ नंतर राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर दोन्ही शिक्षण संस्थांसाठी वाहून घेतले होते. शांताराम पोटदुखे यांचा विदर्भ साहित्य संघाशी १९५८ पासून संबंध होता. जानेवारी १९७९ रोजी भरलेल्या ५३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. विदर्भातील अनेक गुणवत्ताधारक मान्यवरांचा त्यांनी गौरव केला आहे. बाबा आमटे व आनंदवन त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. सत्ता, संपत्ती अथवा पद यांचे त्यांना कधीही आकर्षण नव्हते.