अजय सरकार म्हणतो, मला हत्येच्या आरोपात गोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:50 AM2021-02-06T04:50:59+5:302021-02-06T04:50:59+5:30
चंद्रपूर : ३० सप्टेंबर २०२० रोजी घडलेल्या चंद्रपुरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने ...
चंद्रपूर : ३० सप्टेंबर २०२० रोजी घडलेल्या चंद्रपुरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने तीन आरोपींना जामीन दिला. मुख्य आरोपी अद्यापही अटकेत आहे. या प्रकरणात राजकीय दबावातून आपल्याला गोवण्यात आले आहे. पोलीस खासगीतही हेच सांगत आहेत. हत्येशी काहीएक संबंध नसताना मला का गोवण्यात आले, असा सवाल उपस्थित करून मला न्याय हवा, अशी मागणी मनोज अधिकारी प्रकरणातील आरोपी व नगरसेवक अजय सरकार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
मनोज अधिकारीची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तुम्हाला धोका आहे, असे सांगून सुरक्षेच्या नावाखाली घरून नेले. यानंतर याप्रकरणात आरोपी म्हणून गोवण्यासाठी जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात मोबाइलचे काॅल रेकाॅर्ड मिळविले. यामध्ये हत्या झाली त्या ठिकाणी माझे कुठेलेही लोकेशन आढळून आले नाही. दरम्यान, पद्मापूर, गांधी चौक, निवासस्थान हे माझे लोकेशन मिळाले. घटनेच्या वेळी रवींद्र बैरागी आणि मनोज अधिकारी यांच्या मोबाइलचे लोकेशन एकाच ठिकाणी दाखविल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. जामिनावर न्यायालयातून सुटका झालेल्या एकाही आरोपीचे लोकेशन घटनास्थळी मिळाले नाही, ही बाबही यावेळी अजय सरकार यांनी सांगितली. न्यायालयातून सुटका झाल्यानंतर पोलीस आपल्याला या प्रकरणाशी तुझा काहीएक संबंध नसल्याचे सांगतानाच आमच्यावर राजकीय दबाव असल्याचे सांगत होते. ही वस्तुस्थिती पोलिसांना माहिती असतानाही या प्रकरणात जाणिवपूर्वक गोवण्यात आले असल्याचा गंभीर आरोपही यावेळी अजय सरकारने केला.
तडिपारीची नोटीस
जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याबाबत नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. याचे उत्तर वकिलामार्फत दिले आहे. तत्पूर्वी पोलिसांनी जीवाला धोका असल्याचे कारण सांगून दोन महिन्यांसाठी चंद्रपूर सोडण्याचा सल्ला दिला होता. माझ्या जीवाला धोका आहे, तर पोलिसांनी मला सुरक्षा प्रदान करणे गरजेचे आहे; मात्र ते मला शहर सोडायला सांगत आहे. यावरून सुरक्षा करण्यास कमी पडत असल्याचे दिसून येते, असा आरोपीही यावेळी अजय सरकारने केला.