शैक्षणिक गुणवत्तेसाठी अकोला पॅटर्न राबविणार

By admin | Published: June 10, 2016 01:05 AM2016-06-10T01:05:47+5:302016-06-10T01:09:43+5:30

जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा आणखी सुधारण्यासाठी ‘हेल्थ कीट’ हा अकोला पॅटर्न प्रत्येक जिल्हा परिषद शाळांत राबविला जाईल.

Akola pattern for educational quality will be implemented | शैक्षणिक गुणवत्तेसाठी अकोला पॅटर्न राबविणार

शैक्षणिक गुणवत्तेसाठी अकोला पॅटर्न राबविणार

Next

नव्या सीईओंची पत्रकार परिषदेत माहिती : आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर
चंद्रपूर : जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा आणखी सुधारण्यासाठी ‘हेल्थ कीट’ हा अकोला पॅटर्न प्रत्येक जिल्हा परिषद शाळांत राबविला जाईल. तसेच जिल्हा परिषदेच्या १६०० शाळांमध्ये डिजीटल क्लासरूम सुरू करून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यादृष्टीने जिल्हा परिषदेकडून प्रभावी प्रयत्न केले जाणार असून या सर्व सेवांवर आपली नजर राहील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी दिली.
२०११ च्या बॅचचे आएएस अधिकारी असलेले एम. देवेंद्र सिंग यांनी ३ जूनला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी ते अकोला येथे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. तर एक ते दीड वर्षापूर्वी लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकारी म्हणून दोन वर्ष काम पाहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या जनपद सभागृहात गुरूवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी चर्चा करताना ते म्हणाले, अकोला जिल्ह्यात ‘हेल्थ कीट’ हा उपक्रम यशस्वी ठरला. हेल्थ कीटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला नेलकटर, कंगवा, पावडर आदी स्वच्छता व आरोग्यविषय वस्तू असलेली बॅग देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याची निवड केली जाईल. ते दररोज विद्यार्थ्यांची स्वच्छता तपासणार, असे सांगितले. मिशन नवचेतना उपक्रम अतिशय चांगला असून हा उपक्रम पुढेही सुरू ठेवून गुणवत्ता विकासावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.
प्रत्येक नागरिकांच्या दृष्टीने आरोग्याचा प्रश्न गंभीर असतो. चांगली आरोग्य सेवा पुरविणे हे प्रशासनाचे काम असून आपण याकडे स्वत: नजर ठेवणार आहे. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे प्रकरण उजेडात आले. याबाबत पूर्ण चौकशी करून कारवाई केली जाईल. तसेच जिल्ह्यातील ५८ आरोग्य केंद्राच्या माध्यमातून योग्य आरोग्यसेवा दिली जाते किंवा नाही, याची नियमीत चौकशी करणार असल्याचे सांगितले.
शासनाने जलयुक्त शिवार हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून तलावाचे खोलीकरण, गाळ उपसा आदी कामे हाती घेऊन पाणीपातळी वाढविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन पुढाकार घेईल, असे सीईओ एम. देवेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)

शौचालय बांधकामासाठी
प्रोत्साहित करणार
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. या अभियान अंतर्गत जिल्ह्यातील २४८ ग्रामपंचायतींमध्ये ३५ हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासन पुढील काळात ५० हजार शौचालय बांधणार असून नागरिकांना शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

शासन निर्णयाप्रमाणे व
कर्तव्यदक्षतेने काम करा
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कामचुकारपणा केल्यास अजिबात खपवून घेणार नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याने शासन निर्णयानुसार व कर्तव्यदक्षपणे कामे करावी. प्रत्येक कर्मचाऱ्याने दिलेले काम वेळेत व योग्य रितीने पार पाडावे, असे आवाहन एम. देवेंद्र सिंग यांनी केले.

व्हॉट्स अ‍ॅपवर नोंदविता येणार तक्रारी
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र ते थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून तक्रार नोंदवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला माझ्याकडे तक्रार नोंदविता यावी, यासाठी दोन ते तीन दिवसांत एक व्हॉट्स अ‍ॅप नंबर उपलब्ध करून दिले जाईल. या नंबरवर आलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेऊन सबंधीताची मागणी, समस्या, अडचण निकाली काढल्या जाईल तसेच प्रत्येक पंचायत समिती स्तरावर माझ्या उपस्थितीत समस्या निवारण सभा घेतल्या जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Akola pattern for educational quality will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.