ऐन गणेशोत्सवात भजनी मंडळांचा गजर लुप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:32 AM2021-09-14T04:32:41+5:302021-09-14T04:32:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : गणेशोत्सवात दरवर्षी भजनाच्या माध्यमातून रात्र गजर होत होता. गणेश चतुर्थीपासून भजनाची सुरुवात व्हायची ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : गणेशोत्सवात दरवर्षी भजनाच्या माध्यमातून रात्र गजर होत होता. गणेश चतुर्थीपासून भजनाची सुरुवात व्हायची ती विसर्जनापर्यंत. गावागावांतील भजनी मंडळांकडे घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांकडून निमंत्रण यायचे; परंतु कोरोनाच्या संकटामुळे भजनी मंडळांचा व गणेश उत्सव साजरा करणाऱ्यांचा उत्साह कमी झाला आहे. भजनी मंडळ कसे टिकवून ठेवावे, हा प्रश्न भजनी मंडळींपुढे ठाकला आहे.
बल्लारपूर तालुक्यातील ३३ गावांत ४० च्या वर भजनी मंडळे आहेत. बहुतेक भजनी मंडळ समाजसेवा म्हणून भजनाची परंपरा जोपासत आहे. भजन परंपरा गेली कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. दोन वर्षांपासून घरगुती गणेश उत्सवात व सार्वजनिक गणेश मंडळांनी कोरोनाचे नियम पाळण्यासाठी भजनी मंडळांना बोलावणे बंद केले आहे. प्रशासनाने यावर्षीसुद्धा कार्यक्रमांवर बंदी घालत अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. यामुळे बऱ्याच मंडळांनी भजनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. साध्या पद्धतीने आरती करून गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक भजनी मंडळांनी भर दिला आहे. काही ठिकाणी घरगुती गणपतीसमोर सामाजिक अंतर ठेवून भजनी मंडळ गणेशभक्तांचा उत्साह वाढवीत आहे, अशी माहिती तुकडोजी महाराज भजनी मंडळाचे सदस्य भाऊराव लेडांगे, तबलावादक खुशाल पोयामकर यांनी दिली.
कोट
श्री गणेश उत्सवात भजनाचे कार्यक्रम बंद झाल्यामुळे भजनाचे साहित्य घेणाऱ्यांची व दुरुस्ती करणाऱ्यांची संख्या कमी झाली. उत्सवाच्या आधी भजन मंडळ सर्व साहित्य दुरुस्त करायची. भजनाचे कार्यक्रमच नाही, तर साहित्य दुरुस्त करणेही थांबले. याचा फटका संगीत साहित्य विकणाऱ्या व दुरुस्ती करणाऱ्या दुकानदाराला बसला आहे.
- राकेश तग्रपवार, तबला मेकर्स, बामणी
गणेश उत्सव गणपतीसमोर भजनाचा गजर झाल्याशिवाय अपूर्ण वाटतो. गणेश मंडळांनाही समाधान वाटत नाही. या माध्यमातून भक्तीची भावना जागृत होते; परंतु कोरोना संकटामुळे यावर निर्बंध आले आहे. त्याचे आम्ही पालन करीत आहोत.
- दिलीप दातारकर, गुरुकृपा भजन मंडळ, बल्लारपूर
130921\img-20210912-wa0358.jpg
गुरुकृपा भजन मंडळ