दारूविक्रेत्यांचा हल्ला, १२ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 09:49 PM2019-03-25T21:49:10+5:302019-03-25T21:49:23+5:30
येथील सोमनाथपूर चौकातील येलुकापल्ली यांचे दुकान व घरावर हल्ला केल्याप्रकरणी १२ आरोपींविरुध्द राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : येथील सोमनाथपूर चौकातील येलुकापल्ली यांचे दुकान व घरावर हल्ला केल्याप्रकरणी १२ आरोपींविरुध्द राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दारू विक्रीविषयी पोलिसांना माहिती दिली, या संशयातून २२ मार्चला रात्री ८ वाजता सोमनाथपूर वॉर्डातील काही अवैध दारु विक्रेत्यांनी पत्रकार अंजन व राजेंद्र येलुकापल्ली यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी दगड व विटांचा मारा केल्याने दुकानाचा दर्शनी भाग तुटला. तसेच मोटारसायकलची तोडफोड केली. घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यावर विनोद उर्फ पापा जाधव, अविनाश कोहपरे, सुरेंद्र चौधरी, गौरव पोहनकर, कैलाश पवार, अंजूम, अशफाक व इतर पाच अशा १२ आरोपींविरुध्द दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. प्रभारी ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे व पीएसआय राहुल जवंजाळ अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, राजुरा तालुका पत्रकार संघाचे सदस्य अंजय येलुकापल्ली यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्याचा तालुका पत्रकार संघाने निषेध केला आहे. उपविभागिय अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांना निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी बि. यू.बोर्डेवार, सचिव अनिल बाळसराफ, डॉ. उमाकांत धोटे, मोहन शर्मा आदी उपस्थित होते.
चौकात पोलीस बंदोबस्त
सोमनाथपूर वॉर्डात दारुविक्रेत्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे. घटनेनंतरही येथे दारुविक्रेत्यांचा उपदव्याप कमी झालेला नाही. त्यामुळे सोमनाथपूर चौकात कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश उपविभागिय अधिकारी शेखर देशमुख यांनी दिले आहे. आदेशानुसार चौकात २४ तास पोलीस तैनात केले आहेत.