दारू तस्करीच्या वाहनाचा अपघात
By admin | Published: May 11, 2017 12:36 AM2017-05-11T00:36:44+5:302017-05-11T00:36:44+5:30
वणीकडून अवैद्य देशी दारु भरुन जाणाऱ्या टाटा सुमो पळसगाव-माजरीदरम्यान अचानक उलटली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.
मुद्देमाल जप्त : जखमी चालक घटनास्थळावरून फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वणीकडून अवैद्य देशी दारु भरुन जाणाऱ्या टाटा सुमो पळसगाव-माजरीदरम्यान अचानक उलटली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. परंतु पोलिसांच्या भीतीने तो जखमी अवस्थेत फरार झाला. या टाटा सुमो गाडीत ९० पेटी देशी दारु होती.
माजरी पोलिसांनी पाटाळा फाटा व इतर ठिकाणी नाकाबंदी केली आहे. माजरीचे ठाणेदार क्रिष्णा तिवारी यांना सकाळी ८ वाजता वणीकडून दारू घेऊन टाटा सुमो येत असल्याची माहिती मिळाली.
याची दखल घेत पाटाळा फाट्यावरून माजरी पोलीस स्टेशनचे कैलास मेश्राम, दिनेश वाकडे, अशोक मडावी यांनी तस्करीच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. सुमोच्या चालकाला आपला पाठलाग होत असल्याचे कळताच त्याने भरधाव वाहन चालविणे सुरू केले. वेगात वाहन असल्याने अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरच पलटली. या गाडीत ९० पेटी देशी दारु होती.
त्याची किंमत चार लाख ५० हजार आहे. घटनेनंतर सुमोचालक पोलिसांच्या भीतीपोटी जखमी अवस्थेतच पसार झाला. माजरी पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. ठाणेदार क्रिष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.