वाहनाच्या साऊंड बाक्समधून दारूची वाहतूक
By admin | Published: July 10, 2016 12:39 AM2016-07-10T00:39:00+5:302016-07-10T00:39:00+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून अवैध दारूचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पुरवठा करण्यात येत आहे.
टाटासुमोसह दारू जप्त : सव्वाचार लाखांचा ऐवज जप्त
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून अवैध दारूचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी अवैध दारू विक्रेते वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत आहेत. टाटा सुमोच्या साऊंड बॉक्समध्ये ९६ निपा विदेशी दारूची वाहतूक करीत असताना चिमूर पोलिसांनी दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली.
जिल्ह्यात दारूबंदीनंतर चिमूर शहरात अवैध दारू विक्रेत्यांनी चिमूर पोलिसापुढे मोठे आव्हान उभे केले होते. मात्र नव्यानेच रूजू झालेले ठाणेदार दिनेश लबडे यांनी शहरातील होणाऱ्या अवैध दारू पुरवठ्यावर लगाम लावला आहे. रूजू झाल्यापासून ठाणेदारांनी अवघ्या काही दिवसातच अवैध दारु पुरवठ्याच्या पाच मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यामुळे अवैध दारू पुरवठादारात धास्ती निर्माण झाली. तरी अवैध दारू पुरवठादार वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत दारू आणत आहेतच.
शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याने पेट्रोलिंग करीत असताना टाटा सुमो क्रमांक एमएच ३२ सी ३५१९ या गाडीतून अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सदर वाहनाला टिळक वार्डात थांबवून तपासणी असता वाहनात काहीच मिळाले नाही. मात्र अत्यंत बारकाईने वाहणाची तपासणी केली असता गाडीच्या साऊंड बाक्समध्ये व गाडीच्या बॉडीच्या आतमध्ये मॅकडॉल नंबर वनच्या २४ निपा, ओसी ब्ल्यूच्या ७२ निपा, एकूण ९६ निपा आढळून आला. याची किंमत २८ हजार ८०० रुपये व टाटा सुमो गाडी किंमत चार लाख रुपये असा एकूण चार लाख २८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी समीर लतीप शेख (३२) व संकेत अरुण हरिदास (२८) रा. चिमूर यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनात झाली. (प्रतिनिधी)