दारू विक्रेत्यांकडून महिलांना मारहाण

By admin | Published: May 21, 2016 12:55 AM2016-05-21T00:55:04+5:302016-05-21T00:55:04+5:30

कोंडखल येथे महिलांना मारहाण करण्याचे प्रकरण एक राजकिय षडयंत्र आहे. विवाह सोहळ्यातील पाईपलाईन बाबत ....

Alcohol vendors beat women | दारू विक्रेत्यांकडून महिलांना मारहाण

दारू विक्रेत्यांकडून महिलांना मारहाण

Next

ठाणेदाराने केली दिशाभूल : पोलीस म्हणतात, वाद दारू विक्रीतून नव्हे तर पाईपलाईनच्या मुद्यावरून
गेवरा : कोंडखल येथे महिलांना मारहाण करण्याचे प्रकरण एक राजकिय षडयंत्र आहे. विवाह सोहळ्यातील पाईपलाईन बाबत हा वाद असून यात दारूविक्रीचा कुठलाही मुद्दा नाही. याला अकारण अवैध दारू विक्रीचा रंग दिला जात आहे. यातील एकाही आरोपीवर अवैध दारूविक्रीचा गुन्हा नाही, अशी चुकीची माहिती देऊन सावली येथील ठाणेदार विलास निकम यांनी प्रकरणाला वेगळे वळण देऊन शासनाची दिशाभूल केली, असा आरोप कोंडेखल येथील दारूबंदी महिला मंडळाने पत्रकार परिषदेत केला.
महिलांना मारहाण केल्याप्रकरणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीसमोर दारूबंदी महिला मंडळातील शेकडोच्या वर महिला तसेच गावातील प्रमुख लोक उपस्थितीत होते. ११ मे रोजी दारूबंदी महिलांनी घोडेवाही कोंडेखल हद्दीतील दीड किमी अंतरावर जाऊन किसाननगर येथील दीपक मुठाई यांची मोहफुलाची दारू पकडली. त्यानंतर १५ मे रोजी सायंकाळी अवैध दारू विक्रेत्याकडून महिलांना पोलीस पाटलासमोर मारहाण करण्यात आली. याचा अर्थ गावात सर्रासपणे दारूविक्रीला उधाण आले असुन अवैध दारूविक्रीवर दारूबंदी महिला मंडळांकडून केल्या जात असलेल्या कारवाईबाबत पोलीस आणि दारूविक्रेत्यांमध्ये आकस निर्माण झाला आहे.
कोंडेखल येथील तीन अवैध दारू विक्रेत्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असुन कालिदास नारायण घोडे हा अवैध दारू विक्रेता असुनही पोलिसांच्या हाती अद्याप लागला नसून तो फरार आहे. जामिनीवर सुटून आलेल्या अवैध दारूविक्रेत्यांकडून दारूबंदी करणाऱ्या महिलांना वारंवार जिवे मारण्याची धमक्यासुद्धा देण्यात येत असल्याचे माहिलांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्ह्यात दारूबंदी होण्यापूर्वी कोंडेखल येथे तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावात संपुर्ण दारूबंदी होती. त्यामुळे गावाला पुरस्कार मिळाला. गावाचे नावलौकिक झाले. परंतु गावातील काही जबाबदार लोकांकडून कोंडेखल गावात दारूचा महापूर असून विद्यमान पोलीस पाटील योगराज डोनुजी घोडे मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे पोलीस पाटलाला पदावरून काढून टाकण्यात यावे तसेच अवैध दारू विकणाऱ्या फरार कालिदास नारायण घोडे यांना त्वरीत अटक करण्यात यावी, सात दिवसांपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही तर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही दारूबंदी महिला मंडळाने पत्रकार परिषदेत केला.
अवैध दारू विक्रेत्यांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेलेल्या महिलांना दारूबंदी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नवऱ्यांना सांभाळा, आम्हाला सतराशे साठ कामे आहेत. ५२ गावांचे तंटे आम्हाला सोडवावे लागतात, असे पोलिसांकडून बजावण्यात येते. दारू विक्रेत्याच्या घरी येऊन पार्ट्या खाणाऱ्या पोलीस विभागातील लोकांवर आता विश्वास राहीला नाही.
पोलीस प्रशासन अवैध दारूविक्रेत्यांना मदत करून स्वत: मालामाल होत असल्याने अवैध दारूविक्रीचा महापूर आला आहे. गावातील दारूबंदी समितीतील महिला आपला जीव धोक्यात टाकुन दारू पकडून देत असताना पोलीस विभागाचे सहकार्य मिळत नाही, अशी खंतही दारूबंदी महिलांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
अवैध दारूविक्रेत्यांकडून महिलांना मारहाण करण्यात आल्याच्या घटनेनंतर श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी कोंडेखल येथे जाऊन दारूबंदी महिलांची भेट घेतली. ज्या महिलांना मारहाण करण्यात आली, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)

Web Title: Alcohol vendors beat women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.