मद्यपींनी सहा महिन्यांत रिचवली 94 लाख लिटर दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 05:00 AM2021-12-20T05:00:00+5:302021-12-20T05:00:39+5:30
सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री फोफावली होती. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान जिल्ह्यातील मद्यप्रेमी दारू बंदी हटण्याची चातकाप्रमाणे वाट बघू लागले होते. ५ जुलैपासून परवानाप्राप्त दारू दुकानांतून मद्यविक्री सुरू होताच मद्यप्रेमी दारूवर तुटून पडले होते.
परिमल डाेहणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारू सुरू होताच जिल्ह्यातील मद्यप्रेमींना आनंदाची पर्वणीच ठरली आहे. मागील सहा महिन्यांत जिल्ह्यातील मद्यप्रेमींनी चक्क ९४ लाख ३४ हजार ५४२ लिटर दारू रिचवली आहे. यामध्ये ६१ लाख ७५ हजार ५११ लिटर देशी, १६ लाख ५८ हजार ५४२ लिटर विदेशी तर १५ लाख ६३ हजार ४० लिटर बिअर, ३७ हजार ४४९ लिटर वाइन रिचवली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. या आकडेवारीने चंद्रपूर जिल्हावासीयांनी मद्य पिण्यासाठी बरीच आघाडी घेतली असल्याचे दिसून येते.
सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री फोफावली होती. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान जिल्ह्यातील मद्यप्रेमी दारू बंदी हटण्याची चातकाप्रमाणे वाट बघू लागले होते. ५ जुलैपासून परवानाप्राप्त दारू दुकानांतून मद्यविक्री सुरू होताच मद्यप्रेमी दारूवर तुटून पडले होते.
जुलै महिनाभर तर जिल्ह्यातील बहुतांश दारूविक्रीच्या दुकानासमोर रांगाच्या रांगाच लागलेल्या दिसून आल्या. काही ठिकाणी तर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. अवघ्या सहा महिन्यांतच जिल्हावासीयांनी ९४ लाख ३४ हजार ५४२ लिटर दारू रिचवली आहे. यामुळे शासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मात्र ही आकडेवारी मद्यपींबाबत चिंता व्यक्त करणारी आहे.
ग्रामीण भागात दारूची अवैध विक्री सुरूच
- शासनाने दारूवरील बंदी हटवली असली तरी ग्रामीण भागात अद्यापही दारूची अवैध विक्री सुरूच आहे. ज्या गावामध्ये दारू भट्टी किंवा बार नाही, अशा गावांत अनेकजण दारूची अवैध विक्री करीत असताना दिसून येत आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
देशी दारूवर अधिक प्रेम
जिल्ह्यात देशी दारूपेक्षा विदेशी दारूचे दुकान अधिक आहेत. मात्र तरीसुद्धा मद्यप्रेमींकडून देशी दारूची मागणी अधिक असल्याचे दिसून येते. मागील सहा महिन्यांत ६१ लाख ७५ हजार ५११ लिटर देशी दारूची विक्री झाली आहे. यावरून मद्यप्रेमींचे देशी दारूवर अधिक प्रेम असल्याचे दिसून येते. त्याखालोखाल विदेशी दारुची विक्री झाली आहे.
दारू पिण्यासाठी लागणार परवाना
- देशी असो की विदेशी कोणतीही दारू खरेदी करायची असेल तर ग्राहकाला परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मद्यपींना आजीवन, वार्षिक किंवा दररोजचा परवाना काढता येणार आहे.
- दररोजचा परवाना हा मद्य दुकानामध्ये मिळणार आहे. देशीसाठी दोन, तर विदेशीसाठी पाच रुपयांचा परवाना लागणार आहे. तर आजीवन परवाना एक हजार रुपये, तर वार्षिक परवाना शंभर रुपये शुल्क लागणार आहे.