लाॅकडाऊनच्या काळात बंद असलेल्या सर्वच बसेस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:30 AM2021-02-09T04:30:53+5:302021-02-09T04:30:53+5:30
चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आगार येतात. या आगारांतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. लाॅकडाऊनमध्ये बसेस बंद करण्यात ...
चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आगार येतात. या आगारांतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. लाॅकडाऊनमध्ये बसेस बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी महामंडळाने प्रवासी बसेसना मालवाहतूक बसमध्ये रूपांतरित करून आर्थिक भार पेलण्याचा प्रयत्न केला. आता हळूहळू कोरोनावर मात करून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे महामंडळाने पूर्ण क्षमतेने बसेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये प्रवासाचे एकमेव साधन एसटी आहे. त्यामुळे या भागाकडेही महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे.
लाॅकडाऊनच्या काळात प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यामध्ये प्रवाशांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र आता लोकवाहिनी असलेली एस.टी. पुन्हा रस्त्यावर धावू लागल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
-
बाॅक्स
प्रवाशांची अडचण झाली दूर
जिल्ह्यातील सर्वच मार्गांवरील एसटी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण दूर झाली आहे. चंद्रपूर-नागपूर, चंद्रपूर-घुग्घुस, वणी, चंद्रपूर-गडचिरोली, ब्रह्मपुरी या मार्गांवर नियमित आणि वेळेवर बस सोडली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून आगारांनाही आर्थिक उत्पन्न मिळत आहे. मात्र ज्या मार्गावर बस धावत नाहीत, त्या मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
-
कोट
राजुरा येथून गोवरी, मार्डा येथील बस सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लाॅकडाऊनमध्ये ही बस बंद होती. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र ही बस वेळेवर आणि नियमित सोडावी.
- गोविल इटणकर, गोवरी
---
कोट
नागभीड येथून व्याहाड तसेच इतर गावांसाठी बससेवा सुरू झाली आहे. अद्यापही काही गावांत बस जात नाही. त्यामुळे याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देऊन बस नियमितपणे सुरू करावी. तसेच लांब पल्ल्याच्या बसेस अधिकाधिक सोडण्याचा प्रयत्न करावा.
- नारायण पाचपोर, नागभीड
---
कोट
---
लाॅकडाऊननंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आगारातून नियमित बसेस सोडल्या जात आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- सचिन डफरे
आगारप्रमुख, चंद्रपूर
---
बाॅक्स
सर्वच आगारांची बससेवा रुळांवर
चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर, वरोरा, राजुरा, चिमूर असे आगार असून ब्रह्मपुरी आगार गडचिरोली विभागांतर्गत आहे. दरम्यान, चंद्रपूर विभागातील सर्वच आगारांतील बसेस रुळावर आल्या असून सर्वच बस नियमित धावत आहे. त्यामुळे महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे.