लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पुण्यात
By राजेश मडावी | Published: June 20, 2023 02:42 PM2023-06-20T14:42:11+5:302023-06-20T14:42:31+5:30
निवडणूक तयारीला वेग, दोन दिवसीय कार्यशाळेत होणार मंथन
राजेश मडावी, चंद्रपूर: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सभा घेऊन मैदान गाजविणे सुरू केले असतानाच निवडणूक आयोगानेही आता निवडणूक तयारीला वेग दिला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने २२ आणि २३ जून रोजी पुण्यातील यशदामध्ये कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेला राज्यभरातील जिल्हाधिकारी व निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१८व्या लोकसभेसाठी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणुकीला आठ-नऊ महिने शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यंत्रणा सज्ज होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि मतदान यंत्रणेशी संबंधित तंत्रज्ञ यांना कार्यशाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी संक्षिप्त मतदारयादी पुनर्निरीक्षण यावर चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) प्रथमस्तरीय तपासणीच्या संदर्भात ‘भेल’च्या अभियंत्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधीही निवडणुकीच्या विविध पैलूंची माहिती देणार आहेत.
राज्यासाठी पावणेदोन लाख ईव्हीएम
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील मतदानासाठी ‘भेल’ आणि ईसीआयएलकडून जवळपास पावणेदोन लाख ईव्हीएम प्राप्त होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ९८ हजार मतदान केंद्रांवर नव्या कोऱ्या ईव्हीएमवर मतदान घेतले जाईल, अशी माहितीसूत्रांनी दिली.