सर्व पोलीस ठाण्यांमधून आज आदेश देणार महिला
By admin | Published: March 8, 2017 12:44 AM2017-03-08T00:44:12+5:302017-03-08T00:44:12+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील ठाणेदारपदाचा पदभार ८ मार्चला महिला पोलीस शिपायांकडे दिला जाणार आहे.
ठाणेदारपद महिलांकडे : पोलीस अधीक्षकांचा महिला दिनी उपक्रम
चंद्रपूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील ठाणेदारपदाचा पदभार ८ मार्चला महिला पोलीस शिपायांकडे दिला जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेची चाबी एक दिवसासाठी महिला कर्मचाऱ्यांकडे सोपवून महिला कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास जागविण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी हे पाऊल उचलेले आहे.
मागील वर्षीही हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला होता. एक दिवसासाठी ठाणेदार होणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या हातात सर्व ठिकाणची पोलीस ठाणी राहणार असून त्यांना सहकार्य करणारे कर्मचारीही महिलाच राहणार आहे.
चंद्रपूरच्या पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर महिला अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. एकूण ४५९ महिला कर्मचारी कार्यरत असून त्यात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, १४ पोलीस उपनिरीक्षक, पाच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, १२ हेडकॉन्सटेबल, ५६ पोलीस नाईक आणि ३६९ महिला पोलीस शिपायांचा समावेश आहे.
उद्या ८ मार्चचे औचित्य साधून या कर्मचारी-अधिकाऱ्यांमधूनच एक दिवसाच्या ठाणेदारांची निवड करण्यात आली आहे. सर्व ठाण्यांमध्ये महिलाराज दिसणार असून विद्यमान ठाणेदारांकडे एक दिवसासाठी देखरेखीची जबाबदारी दिली जाणार आहे. या निमीत्याने सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
महिला कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि अन्य कर्मचाऱ्यांना पे्ररणा मिळावी हा या उपक्रमामागील हेतू आहे. महिला सक्षमतेचा परिचय या उपक्रमातून समाजातील अन्य घटकांना व्हावा, हा देखील या मागील हेतू आहे.
- संदीप दिवाण,
जिल्हा पोलीस अधीक्षक