ब्रह्मपुरी नगर पालिकेत आरोप-प्रत्यारोप
By admin | Published: July 15, 2015 01:13 AM2015-07-15T01:13:04+5:302015-07-15T01:13:04+5:30
तालुक्यात पाऊसाची सर्वानांच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसापासून पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जण पावसाची डोळे लावून वाट पाहत आहेत.
विकास कामांकडे दुर्लक्ष : युतीचा वाद चव्हाट्यावर
ब्रह्मपुरी : तालुक्यात पाऊसाची सर्वानांच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसापासून पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जण पावसाची डोळे लावून वाट पाहत आहेत. पण ब्रह्मपुरीच्या नगरपालिकेत मात्र आरोप -प्रत्यारोपाचा पाऊस गेल्या आठ दिवसांपासून सुरु असल्याने ब्रह्मपुरीची जनता ऱ्हाऊन निघाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
येथील नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे १०, स्वतंत्रविकास आघाडीचे ९ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १ असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापत करताना भारतीय जनता पार्टी व स्वतंत्र विकास आघाडीची युती होऊन विरोधी पक्ष संपुष्ठात आणल्या गेले. जनतेला या निर्णयाचे मोठे कौतुक वाटायला लागले व विकासाच्या अपेक्षाही भोळी जनता मनात ठेवू लागली. सत्ता स्थापनेनंतर काही काळ गुण्यागोविंदाने गेली. परंतु अचानकच कुठे माशी शिकंली हे कळेनासे झाले व आरोप प्रत्यारोपांचा ऐन पावसाळ्यातच पाऊस पडत असल्याने नागरिक ओले चिंब झाले आहेत.
पाच प्रभागापैकी लॉटरी लागावी असे एकाच पक्षाचे उमेदवार प्रभाग १, २ व ३ मध्ये निवडणून आले. व विकास निधी या मुद्द्यावरुन आरोप- प्रत्यारोप सुरु झाले. सभागृहातील मुद्दे बाहेर येऊ लागल्याने जनतेला धक्के बसू लागले आहे. कारण २० वर्षाच्या पालिकेच्या इतिहासात असे झाले नाही. त्यामुळे जनतेला नवीन प्रकार पाहावयास मिळत आहे. जनता विकासासाठी आसुसलेली आहे.
जनतेला या आरोपांचे काहीच देणे घेणे नाही. परंतु नगरपरिषदेची वाहवा अशा माध्यामातून वाढण्याऐवजी खालावत जाण्याचा प्रकार होऊ शकतो, हे सर्वानी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीच गुंठेवारी प्रकरणाने नगर परिषदेची पत गेली आहे आणि पुन्हा या वादाच्या पावसाने पालिका धूऊन निघत असल्याने जनतेने कोणाला न्याय मागावा, हा मोठा प्रश्न आहे.
विकासाच्या कामात सर्वानी हातभार लावण्यामध्ये ब्रह्मपुरीकर मागे नाही. तेवढी मानसिकता आजही जिवंत आहे. मात्र चूक कोणाची व बरोबर कोणाचे हे पाहिले जात नाही. तरीपण असे का होत आहे, असा गहन प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. सत्ता स्थापनेवेळी जे ठरले असेल त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. त्यासाठी तडजोड महत्वाची आहे. त्या तडजोडीला मोठी तडा आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून झाली तर जनतेची स्वप्ने भंग होतील व पुन्हा जनतेला मते मागताना उत्तरे देता येणार नाही. (प्रतिनिधी)