अपंग मनोजची जगण्यासाठी केवलवाणी धडपड
By admin | Published: May 1, 2016 12:37 AM2016-05-01T00:37:42+5:302016-05-01T00:37:42+5:30
दोन्ही पायांनी विकलांग असलेल्या मनोजने चार-पाच वर्षांपूर्वी अवैध दारूविक्री करीत आपल्या संसाराचा गाडा हाकत होता.
प्रशासनाकडून आश्वासनाची खैरात : अवैध धंद्यातून बाहेर पडलेल्या युवकाची व्यथा
शशिकांत गणवीर भेजगाव
दोन्ही पायांनी विकलांग असलेल्या मनोजने चार-पाच वर्षांपूर्वी अवैध दारूविक्री करीत आपल्या संसाराचा गाडा हाकत होता. अशातच जिल्हा दारूबंदीची मागणी रेटणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेशी मनोजचे संंबध आले. या संस्थेच्या कार्याने मनोजने प्रभावित होऊन दारूबंदीच्या कार्यात स्वत:ला झोकुन दिले. आपण अपंग असतानाही दारूचा धंदा बंद करून समाजासमोर नवा आदर्श दिला.
दारूमुळे सामाजिक वातावरण बिघडत होते. कुटुंबा कुटुंबांमध्ये कलह निर्माण होऊन भांडण होत होते. आपण या व्यतिरिक्तही काही नविन करता येते या धाडसाने दारू व्यवसाय बंद केला.
यानंतर मनोजने नव्या आशेने सन २००९ मध्ये श्रमिक सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून काही काम मिळेल, या आशेने सहा-सात वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजविले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मनोज रामदास पिपरे (३१) असे नाव असलेला हा युवक भेजगाव येथून जवळच असलेल्या येसगाव येथे रहिवासी आहे. त्याच्या घरी अठराविश्व दोरिद्रय असल्याने घरची परिस्थिती हलाखीची आहे. परिणामी बालपणी झालेल्या पोलिओवर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे मनोजला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. अगदी खेळण्या बागडण्याच्या वयातच मनोजला विकलांग व्हावे लागले.
संस्था नोंदणीच्या तीन वर्षानंतर बेरोजगारांना मानधन मिळेल, अशी आशा एका अधिकाऱ्याने दाखविली. मात्र या आशेवर राहणाऱ्या मनोजला ना मानधन ना काम मिळाले.
आज ना उद्या काम मिळेल या आशेने संस्थेच्या लेखा परिक्षणासह कागदपत्रे निट सांभाळतो आहे. जगण्यासाठी आटापिटा करतानाच मनोजने नात्यातीलच एका मुलीशी विवाह केला. एक मुलगा असल्याने पुन्हा कुटुंबांची जबाबदारी वाढली. परिणामत: मनोज हलाखीचे जीवन जगत आहे.
मूल येथील एका प्रतिष्ठित धनदांडग्या राजकीय पुढाऱ्याने अपंग मनोजचे नाव आघाडीच्या काळात मंत्र्यांसमोर पुढे करून मनोजची व्यथा मांडली. मंत्री महोदयांनाही पाझर फुटला. अपंग मनोजची अवस्था अन् तळमळ पाहुन मंत्री महोदयांनी आठ दिवसांत संस्थेला मिटर रिडींगचे काम मिळवून दिले. मात्र मनोजच्या संस्थेला मिळालेले काम या राजकीय पुढाऱ्याने आपल्याच पदरात पाडून घेतले व मनोजच्या संस्थेच्या नावावर जवळपास दहा लाख रुपये बिलाची उचल केली. मात्र या कामाचा एक रुपयाही मनोजला मिळाला नाही.
अपंग मनोजची या पुढाऱ्यांनी विश्वासघात करीत फसवणूक केली याचे शल्य अजुनही मनोजला बोचत आहे.
अपंगांना अंत्योदयमध्ये सामावून घेवून त्यांना अन्नधान्य व घरकुलाचा लाभ प्रशासनाने द्यावा, अशी मागणी मनोजची आहे.
सात-आठ महिन्यांपूर्वी सेतू केंद्रातील आॅपरेटर भरण्याच्या संदर्भाने संस्थेला पत्र आले असता मनोजने तालुकास्तरावर तहसील कार्यालयात आॅपरेटर देण्यासाठी प्रयत्न केले. संस्थेची निवडही झाली. संस्थेने आॅपरेटरची माहितीही दिली. मात्र प्रशासनाच्या लाचखोर व हलगर्जी धोरणाने मनोजच्या संस्थेला काम मिळाले नाही. पर्यायाने मनोजने जिल्हाधिकारी म्हैसेकर यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे आपली व्यथा मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांत काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचेही आश्वासन हवेत विरले.