जलाशयातील गाळ उपसण्याची परवानगी द्या

By admin | Published: May 29, 2016 01:03 AM2016-05-29T01:03:40+5:302016-05-29T01:03:40+5:30

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम हे दोन प्रकल्प नाबार्ड व राज्यशासनाच्या निधीतून...

Allow the drainage of the reservoir | जलाशयातील गाळ उपसण्याची परवानगी द्या

जलाशयातील गाळ उपसण्याची परवानगी द्या

Next

आबीद अली यांची मागणी : तर प्रकल्पाची क्षमता वाढून शेतकऱ्यांना लाभ
गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम हे दोन प्रकल्प नाबार्ड व राज्यशासनाच्या निधीतून शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून १९८५ ते १९९५ च्या दशकात आदिवासी गावाच्या डोंगर पायथ्याशी कार्यान्वित झाले. अमलनाला २९३१ हेक्टर व पकड्डीगुडम २९६८ हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या लाभ क्षेत्रात प्रस्तावित आहे. यामध्ये लाभ क्षेत्रातील २५ ते ३० गावे समाविष्ट असून जलसाठा क्षमता अमलनाला २४.२६ द.ल.घ.मी तर पकड्डीगुडम ११.०७ द.ल.घ.मी आहे. मात्र प्रस्तावित क्षेत्रात समाविष्ट केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचविण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरले असून विभागाला तब्बल ३० वर्षात उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. आता या जलाशयातील गाळ उपसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते सय्यद आबीद अली यांनी केली आहे.
प्रस्तावित लाभ क्षेत्रातील खिरडी, वडगाव, पिंपळगाव, लखमापरू, भेडवी, थुटरा, धामगणाव, वनसडी, देवघाट, सोनुर्ली, पिपर्डा या गावात अनेक शेतकरी कोरडवाहूच शेती निसर्गाच्या भरवशावर करीत आहे. तब्बल ३० वर्षे लोटूनसुद्धा ओहोटी नाल्याने पाणी वाया जात आहे. अनेक पाटचारी व लघुवितरिका अपूर्ण अवस्थेत आहे. पाणी बांद्यावर जाण्याऐवजी नाल्याच्या प्रवाहाने वाहून व्यर्थ जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व हरित क्रांतीचे स्वप्न हवेत विरघळले. मात्र पाटबंधारे विभागाकडून कचरा साफ करण्याव्यतिरिक्त दुरुस्ती हाती घेऊन सिंचने वाढविण्याचा प्रयत्न झाला नाही. उलट या प्रकल्पाचे पाणी अंबुजा, अल्ट्राटेक, माणिकगड सिमेंट उद्योगांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे प्रस्तावित क्षेत्रात २३०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित झाले. त्याबरोबर याच प्रकल्पामधून १४ गावाच्या ग्रामीण पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा केला जातो. अमलनाला धरणामध्ये जलक्षेत्र २४.२६ द.श.घ.मी होते. मात्र त्या ठिकाणी गाळसाठा झाल्याने २.०८ द.श.घ.मी. पाणीसाठा कमी झाला. उलट या ठिकाणी सांंडण्याची उंची व मीटर वाढवूनसुद्धा २.८० द.श.घ.मी म्हणजेच उपयुक्त साठा २७.०६ अपेक्षित होता. तो साध्य झाला नाही, आदिवासी भागातील दोन्ही प्रकल्प शेतकऱ्यांच्या ऐवजी सिमेंट कंपन्यांना वरदान ठरले असून लाभ क्षेत्रातील अनेक गावे भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. लखमापूरसारख्या गावी टँकरने पाणी पुरवठ्याची वेळ आलेली आहेत.
सदर भागात उद्योग आले. मात्र उत्तरेला पैनगंगा वाहते १०० कि.मी. क्षेत्रात आदिलाबादपासून सुबई या गावापर्यंत कुठेही उच्च पातळीचा बांध नदीवर नाही. १० वर्षांपूर्वी शिवणी बॅरेजचे सर्वेक्षण झाले. त्यापुढे हे काम सरकलेच नाही. दोन्ही प्रकल्पामध्ये जंगली भागातील पालापाचोळा व गाळ साठलेला आहे. शेतीच्या जमिनीत त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. धरणातील जलसाठा वाढण्याससुद्धा मदत होईल. शासनाने धरणातून गाळ उपसण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी आबीद अली यांनी ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Allow the drainage of the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.