निवडणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना सव्वादोन कोटी रुपयांचा भत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 02:29 PM2024-12-03T14:29:57+5:302024-12-03T14:32:56+5:30
Gadchiroli : मतमोजणीनंतर तीन दिवसांत रक्कम खात्यात सुरक्षा दलाची शेवटची तुकडीही परतली, सर्व जवान स्वजिल्ह्यात सुखरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत नक्षल प्रभावित व अतिदुर्गम गडचिरोली कर्तव्य बजावणाऱ्या १६ हजार जवानांना मतमोजणी प्रक्रियेनंतर तिसऱ्याच दिवशी भत्त्याची रक्कम अदा करण्यात आली. एवढ्या जलदगतीने भत्ता देणारा गडचिरोली एकमेव जिल्हा ठरला आहे. सुरक्षा जवानांच्या भत्त्यापोटी प्रशासनाला सुमारे सव्वादोन कोटी रुपये मोजावे लागले.
ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राज्य सशस्त्र पोलिस दलाच्या १११ कंपन्या तसेच नागपूर शहर, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील प्रशिक्षण सुरु असलेले नाशिक व पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर अशा विविध ठिकाणांहून एकूण ५०० पोलिस उपनिरीक्षक व अंमलदार तसेच स्थानिक ७०० च्या वर गृहरक्षक दलाच्या सुरक्षा जवानांसह एकूण १६,००० च्या वर सुरक्षा जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुर्गम, अतिदुर्गम भागात मतदानानंतर टप्प्याटप्याने सुरक्षा जवानांना परत आणण्यात आले. सुरक्षा दलातील शेवटची टीम १ डिसेंबरला परतली. त्यानंतर सर्व जवानांना सुरक्षितपणे आपापल्या ठिकाणी परत पाठविण्यात आले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. दरम्यान, या जवानांनी केलेल्या खडतर सेवेनंतर प्रशासनाने तत्परता दाखवत त्या सर्वांना तिसऱ्याच दिवशी भत्ता अदा करण्यात आला. याकरिता जिल्हाधिकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पाठपुरावा केला. इतर जिल्ह्यांमध्ये निवडणुकीनंतर सहा-सहा महिने उलटूनही सुरक्षा कर्तव्याचा भत्ता मिळत नसल्याची ओरड असताना गडचिरोलीच्या प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेची सर्वत्र चर्चा आहे.
३६७ अतिसंवेदनशील केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान
निवडणूक बंदोबस्ताकरिता तैनात संपूर्ण सुरक्षा जवानांना निवडणुकीच्या अनुषंगाने उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आलेले होते. जिल्ह्यातील ३६७ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आलेले असून, सी- ६० सीआरपीएफ शीघ्र कृती दल, विशेष कृती दल पथकाच्या ३६ तुकड्यांमार्फत जिल्ह्यातील अतिसंवेदनशील जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. त्यामुळे कोठेही अनुचित घटना घडली नाही.
छत्तीसगड, तेलंगणातील पोलिसांचीही मदत
छत्तीसगड व तेलंगणातून माहाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शिरकाव करत असतात. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत कुठलीही अप्रिय घटना होऊ नये वासाठी छत्तीसगड व तेलंगणा सीमावर्ती भागात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले होते. शिवाय दोन्ही राज्यांतील पोलिसांना विनंती करुन तेथेही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात नक्षल्यांच्या हालचालींवर तेथील जवान लक्ष ठेवून होते, या नक्षलविरोधी मोहिमेचाही चांगला फायदा झाला.