रुग्णसेवेसोबतच त्यांनी जपला सामाजिक वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:58+5:302021-05-14T04:27:58+5:30
डॉ. गिरी ठरताहेत वैद्यकीय क्षेत्रासाठी आदर्श वेदांत मेहरकुळे गोंडपिपरी : चक्क लोखंडाचे रूप बदलून सोन्यात रूपांतर करणारा काल्पनिक दगड ...
डॉ. गिरी ठरताहेत वैद्यकीय क्षेत्रासाठी आदर्श
वेदांत मेहरकुळे
गोंडपिपरी : चक्क लोखंडाचे रूप बदलून सोन्यात रूपांतर करणारा काल्पनिक दगड म्हणजे पारस होय. पारस हा काल्पनिक दगड असेल. मात्र, पारस नावाच्या डॉक्टरी पेशातील देव माणसाने गोंडपिपरी तालुक्यातील सर्वसामान्यांना अहोरात्र मेहनत घेऊन आरोग्य सेवा देत अनेकांना कोरोना महामारीतून वाचविले. सोबतच कोरोना रोगाची तीव्रता वाढून मृत पावलेल्या अनेकांच्या मृतदेहांना अंत्यसंस्कारासाठी वाहनात टाकत असताना आपल्या पदाचा गर्व बाळगला नाही. त्यांच्या या सेवेला सलाम ठोकत सोशल मीडियावरही कौतुक झाले. आपल्या कार्यातून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी नवा आदर्श ठेवला आहे.
संपूर्ण जगात कोरोना महामारीने विळखा घातला असून सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरू आहे. अशातच गोंडपिपरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच असून याकरिता आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालयाने स्वतंत्र असे कोविड सेंटर उभारून तेथे डॉ. पारस गिरी यांची नियुक्ती केली. जिल्हा सीमेवर वसलेला अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासीबहुल असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात ९८ गावाखेड्यांचा समावेश आहे. विस्तारित तालुका म्हणून ओळखला जातो. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण तालुक्यात थैमान घातले. सोबतच इतर आजारांचे रुग्ण अशा गंभीर परिस्थितीत रात्रंदिवस मेहनत घेत डॉ. गिरी यांनी अनेक रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल अगदी ६० ते ६५ इतकी कमकुवत असताना वरिष्ठांशी सल्लामसलत करून तसेच आपल्या वैद्यकीय अभ्यासाच्या बळावर अनेकांचे प्राण वाचविले आहेत. याबरोबरच ग्रामीण रुग्णालयातील ओपीडी व आंतररुग्ण विभागातही ते सेवा देण्यास सक्षम ठरले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोना आजाराची तीव्रता अधिक वाढल्याने काही प्रमाणात मृत्यू संख्याही वाढली. याच दरम्यान मृत पावलेल्या व्यक्तींच्या शवाचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्थानिक नगर प्रशासनाकडे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी नगर पंचायतीचे कर्मचारी वसंत गेडाम यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तसेच इतर काही कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने अपुऱ्या मनुष्यबळाअभावी मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याकरिता मृतदेहांची वाहतूक करताना फार मोठी अडचण निर्माण होत होती. अशा विदारक परिस्थितीत स्वतःच्या पदाचा कुठलाही गर्व न बाळगता व जिवाची पर्वा न करता डॉ. गिरी हे स्वतः कोविड सेंटर येथे मृत पावलेल्यांच्या मृतदेहांना वाहनात टाकण्यासाठी हातभार लावताना दिसून येतात. त्यांचे हे कार्य वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना प्रेरणादायी व आदर्श ठरत आहे.
बॉक्स
सोशल मीडियावर कौतुक
काही प्रत्यक्षदर्शींनी याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करताच वैद्यकीय पेशातील देवरूपी माणूस म्हणून संबोधल्या जाणाऱ्या डॉ. पारस गिरी यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच वैद्यकीय क्षेत्रातील इतरांनीही डॉक्टर गिरी यांच्या कार्याचे अवलोकन करून रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा असे समजून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.