झरण क्षेत्रात आश्चर्यकारक हातपंप
By admin | Published: May 21, 2016 12:58 AM2016-05-21T00:58:28+5:302016-05-21T00:58:28+5:30
जमिनीत पाण्याकरिता खोदलेल्या हातपंपाद्वारे जमिनीतील पाणी पंपाच्या हालचालीविना बाहेर उत्सर्ग होतच नाही.
पंपाची हालचाल बंद, तरीही २४ तास पाण्याचा उत्सर्ग सुरु
वसंत खेडेकर बल्लारपूर
जमिनीत पाण्याकरिता खोदलेल्या हातपंपाद्वारे जमिनीतील पाणी पंपाच्या हालचालीविना बाहेर उत्सर्ग होतच नाही. मात्र, एक हातपंप असेही आहे, ज्याला पंप हलविण्याची गरजच नाही. पंप न हलविताही पाणी आपोआप बाहेर येत आहे व ही क्रिया सतत २४ तास अखंडपणे सुरु आहे आणि तेही एक, दोन दिवस नव्हे तर पाण्याचा हा उत्सर्ग गेल्या २० वर्षांपासून जराही खंडीत न होता सुरु आहे. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तीनही ऋतूमध्ये पाण्याची सारखीच धार पडत आहे. हे आश्चर्यचकित करणारे हातपंप बल्लारपूर- गोंडपिपरी मार्गावरील निसर्गरम्य झरण या ठिकाणाहून सहा किलो मीटर अंतरावरील कन्हाळगाव या वनक्षेत्रात आहे.
कन्हाळगाव हे वनग्राम वनविकास महामंडळाच्या मध्य चांदा वन प्रकल्पात येतो. वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी या प्रकल्पाला पत्रकारांसह नुकतीच भेट दिली. यावेळी वन अधिकाऱ्यांनी या हातपंप स्थळी नेऊन ही किमया दाखविली. या विषयी माहिती जाणून घेतली असता, पाण्याची या भागातील गरज भागविण्याकरिता सुमारे २० वर्षाआधाही वन विभागाने बोरिंग खोदले. त्यावर हँडपंपही लावला. मात्र, हँडपंप हलविण्याची गरजच कधी भासली नाही. आतील पाणी बोरिंगने आपोआप बाहेर येणे सुरु झाले. तेव्हापासून मोठ्या धारेने पाणी बाहेर पडणे सदोदित सुरुच आहे. हे पाणी शुद्ध तसेच चवदार आहे. रात्रंदिवस सारखे बाहेर पडणारे पाणी वाहून वाया जात आहे. बोरिंग जवळच टाके बांधून पाण्याची त्यात साठवण करुन या पाण्याचा वापर वृक्ष संवर्धनाकरिता करण्यात येईल, याबाबत निश्चित काही केले जाईल, असे चंदेल म्हणाले. कन्हाळगावच्या नागरिकांनी ‘लोकमत’ला या हातपंपाबद्दल माहिती देताना सांगितले की, कित्येक वर्षापासून पाण्याचा आपोआप उत्सर्ग सुरु आहे. हे कसे होत आहे, याचे आश्चर्य आम्हालाही आहे. काहीही न करता पाणीच पाणी निघतो हे एक आश्चर्यच!