चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात अंबाडी सरबत उद्योगास वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 02:25 PM2020-12-17T14:25:21+5:302020-12-17T14:26:34+5:30
Chandrapur News Ambadi उन्हाळ्यात उन्हाची काहिली कमी करणारा आणि खेडयांमध्ये घरोघरी वापरल्या जाणाऱ्या अंबाडीच्या सरबत उद्योगास नागभीड तालुक्यात मोठा वाव आहे. मात्र त्या दिशेने सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज आहे.
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: उन्हाळ्यात उन्हाची काहिली कमी करणारा आणि खेडयांमध्ये घरोघरी वापरल्या जाणाऱ्या अंबाडीच्या सरबत उद्योगास नागभीड तालुक्यात मोठा वाव आहे. मात्र त्या दिशेने सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज आहे.
नागभीड तालुक्यात धानाची शेती होते. पाऱ्यांवर तुरी लावल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक शेतकºयांच्या शेतातील पाºयांवर ही वनस्पती अगदी सहज उगवते. या वनस्पतीच्या पाल्याचा उपयोग भाजीमध्येही मोठया प्रमाणात करण्यात येतो. आयुर्वेदात आंबाडीला मानाचे स्थान आहे.
दिवाळीच्या सुमारास आंबाडी परिपक्व होते. परिपक्व झाल्यानंतर आंबाडीचे फळ लालभडक होते. चवीला आंंबट असल्याने या फळाचा ग्रामीण भागात भाजीमध्येही उपयोग केला जातो. मात्र या आंबाडीचा सर्वात जास्त उपयोग सरबतासाठी केला जातो. फळ परिपक्व झाले की आंबाडीचे झाडांची कापणी करून ते घरी आणले जाते. नंतर फळावरील लालभडक दिसणारा भाग वेगळा करून तो वाळवले जातो. चांगला वाळल्यानंतर खलबत्त्यामध्ये बारिक कूट केला जातो. नंतर बारिक करण्यात आलेल्या या कुटाचा उन्हाळ्यात सरबतासाठी उपयोग करण्यात येतो.
एखादा मोठा उद्योग येण्याची गरज
व्यावसायिक रूपाने या आंबाडीवर प्रक्रिया करून त्याचे सरबत तयार करण्यात आले तर या आंबाडीच्या पिकास चालना मिळू शकते. मागणी वाढल्यास शेतकरी आंबाडीचे पीकही घेऊ शकतात. उद्योगाचे रूप दिल्यास काही तरूणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी एखाद्या उद्योजकाने पुढे येण्याची गरज आहे.