अपघातग्रस्त जनावरांवर वेळीच उपचारासाठी दिली रुग्णवाहिका भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:30 AM2021-07-30T04:30:10+5:302021-07-30T04:30:10+5:30
चंद्रपूर : जनावरांचा कळवळा अनेकांना असला, तरी त्यांच्यासाठी धावून जाणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. चंद्रपुरात प्यार फाउंडेशन मात्र या मुक्या ...
चंद्रपूर : जनावरांचा कळवळा अनेकांना असला, तरी त्यांच्यासाठी धावून जाणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. चंद्रपुरात प्यार फाउंडेशन मात्र या मुक्या प्राण्यांसाठी सातत्याने झटत आहे. अनेक अडचणींवर मात करून त्यांची ही भूतदया सुरू आहे. त्यांना मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरुवारी चक्क रुग्णवाहिकाच भेट दिली. पुगलिया यांची भूतदया पाहून प्यार फाउंडेशनचे पदाधिकारी यावेळी भावुक झाले होते.
प्यार फाउंडेशनद्वारे मोकाट जनावरांचे संरक्षण, देखभालीसह त्यांच्यावर औषधोपचार करतात. सध्या जखमी पशुपक्ष्यांवर उपचार सुरू आहे. अलीकडे उत्तर प्रदेशात जाऊन एका कुत्र्याला जीवदान दिले होते. ही बाब हेरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अचानक संस्थेेला भेट दिली. संस्थेचे कार्य बघून ते भारावले. त्याचक्षणी त्यांनी मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने रुग्णवाहिका भेट देण्याचे जाहीर केले. केवळ आश्वासन देऊन ते शांत राहिले नाही तर त्यांनी रुग्णवाहिका आज आपल्या समक्ष काँग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया यांच्या हस्ते प्यार फाउंडेशनच्या सुपूर्द केली. या रुग्णवाहिकेमुळे अपघातग्रस्त जनावरांना वेळीच उपचार करणे सोयीचे होणार आहे. यावेळी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर ग्रामीणचे अध्यक्ष गजानन गावंडे, शहराध्यक्ष देवेंद्र बेले, जिल्हा महासचिव ॲड. अविनाश ठावरी, जिल्हा महासचिव, नगरसेवक अशोक नागापुरे, इंटक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, मजदूर काँग्रेसचे वसंतराव मांढरे, तारासिंह कलशी, रामदास वाग्दरकर, क्रिष्णा नायर, वीरेंद्र आर्या, सुभाष माथनकर, राजेश शुल्का, गजानन दिवसे, अनिल तुगीडवार, आशिष मेहता, माजी नगरसेवक विनोद पिंपळशेंडे, अनंता हुड, सुधाकरसिंह गौर, बाबुलाल करुणाकर, अजय महाडोळे, दुर्गेश चौबे आदींची उपस्थिती होती.