माओवाद्यांच्या जंगलात चित्रीत ‘घात’ चित्रपट सातासमुद्रापार; बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 11:39 AM2023-02-02T11:39:24+5:302023-02-02T11:42:55+5:30

पोंभुर्ण्याचा कलावंत धनंजय सुधाकर मांडवकर मुख्य भूमिकेत

'Ambush' filmed in Maoist jungle to be screened at Berlin Film Festival; Pombhurna's Dhananjay Sudhakar Mandavkar are in the lead role | माओवाद्यांच्या जंगलात चित्रीत ‘घात’ चित्रपट सातासमुद्रापार; बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार

माओवाद्यांच्या जंगलात चित्रीत ‘घात’ चित्रपट सातासमुद्रापार; बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार

Next

पी.एच.गोरंतवार

पोंभूर्णा (चंद्रपूर) : ९५ टक्के वैदर्भिय कलावंताला घेऊन बनविण्यात आलेला छत्रपाल निनावे यांचा माओवाद्यांच्या जंगलात चित्रित स्लो-बर्न थ्रिलर असलेला ‘घात’ चित्रपट ७३ व्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झळकणार आहे.

भारताकडून पाठविण्यात आलेल्या ‘घात’ चित्रपटात पोंभुर्ण्याचा कलावंत धनंजय सुधाकर मांडवकर यांची प्रमुख भूमिका असून हा सन्मान धनंजयच्या रूपाने झाडीपट्टीतील पोंभुर्ण्यासारख्या छोट्याश्या गावाला मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. घात हा मुख्यतः गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद पसरलेल्या भागात आदिवासींचे जगणे, आदिवासींची कला कौशल्य व संस्कृतीचे दर्शन घडविणारा चित्रपट आहे. गडचिरोलीतील समस्या, आदिवासींचे प्रश्न, नक्षलवाद पसरलेल्या भागात पोलिसांचे नागरिकांसोबत असणारे संबंध व सदृश्य घटना उघड होताना दिसते. हा एक थ्रिलर आहे, जो जंगलात खोलवर जातो आणि त्यातील पात्रांच्या मनातही खोलवर जातो.

हा चित्रपट विदर्भातील ९५ टक्के कलावंतांना घेऊन बनविलेला असून फिल्म स्टुडिओ प्लॅटून वन फिल्म्सचा नवीन रोमांचक वैशिष्ट्यासह ‘घात’ चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झडकण्यासाठी सज्ज झाला आहे. जगातील आघाडीचा चित्रपट महोत्सव असलेला बर्लिन चित्रपट महोत्सव येत्या १६ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

चतुरस्त्र कलावंत धनंजय मांडवकर

मुलांची प्राथमिक शाळा पोंभूर्णा येथून अशोक बासनवार गुरुजींच्या नेतृत्वाखाली जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रमात धनंजयने चौथा वर्गात असताना रंगमंचावर पाऊल टाकले आणि त्याच्यातील अभिनय कलेचे रोपटे मोठे होवू लागले. पुढे चंद्रपूर,नागपूर असा प्रवास करीत धनंजयने मास्टर ऑफ फाईन आर्ट्समध्ये नाट्यशास्त्र विभागात मास्टर डिग्री केली आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (दिल्ली) येथून विशेष कार्यशाळेत प्रशिक्षण घेतले. द्वंद्व, राकोश, कंबल, या चित्रपटात लहान भूमिकांपासून त्याने सुरुवात केली. दस्तखत, ब्यान्नव, बॅक डोअर या लघुपटात अभिनय केला आहे.

२०१६ मध्ये ‘धनंजय’ने चित्रपटाच्या प्रेमापोटी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथील नोकरी सोडली आणि चित्रपट क्षेत्रातील नव्या वाटेवर पाऊल ठेवले. खरंतर त्याचा हा संघर्ष २००२ पासूनच सुरु होता. अनेक अडथळे पार करत आज २०२३ मध्ये त्याच्या या संघर्षाला यश मिळाले आहे. पोंभुर्ण्यासारख्या ग्रामीण भागात एका शेतकरी व शिक्षक कुटुंबात वाढलेला धनंजय आज बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘घात’च्या माध्यमातून वर्ल्ड प्रीमियर झळकणार आहे.

निसर्गाच्या सानिध्यात राहूनच आधी लेखन, नंतर अभिनय सादर करता आले. ग्रामीण भागातील दंडार, नाटक, एकपात्री प्रयोग पाहून अभिनय समजून घेता आला. त्यातून भजन किर्तन,पोवाडे एवढंच काय तर वासुदेव व गोरखनाथाचे पाळणेही सुटले नाही. आई, वडील,गुरूवर्य, मित्रमंडळी, माझ्या चित्रनगरी साधनेतील कलावंत व मार्गदर्शकांमुळेच हे शक्य झाले आहे.

- धनंजय सुधाकर मांडवकर, चित्रपट कलावंत पोंभूर्णा

Web Title: 'Ambush' filmed in Maoist jungle to be screened at Berlin Film Festival; Pombhurna's Dhananjay Sudhakar Mandavkar are in the lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.